धाराशिव दि.20 (प्रतिनिधी)- राज्यात 210 निजामी मराठा वेगवेगळ्या पक्षात सत्तेवर बसलेले आहेत. गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये निजामी मराठा बसलेला आहे. ती सत्ता रयतेच्या मराठ्याकडे जाणार नाही याचा खेळ यशस्वीरित्या राबवलेला आहे व यापुढेही राबवतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

धाराशिव येथील हॉटेल पुष्पक येथे दि.20 मे रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन पत्रे लिहिली होती. त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ला साहजिकच दोषी धरले होते. मात्र भीमा कोरेगाव आयोगाने पवार यांना तुम्ही आम्हाला ती दोन पत्रे सादर करा अशा दोन वेळा नोटीसा पाठविल्या मात्र अजून पर्यंत त्याचे उत्तर आलेले नाही. आता अजित पवार यांची भारतीय जनता पार्टी बरोबर युती असल्यामुळे अजित पवार यांच्यामार्फत शरद पवार यांना भाजपमध्ये जाण्याचा मार्ग असल्याचा खळबळजनक दावा यांनी केला. ॲड आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी मत व्यक्त केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण बागुल, ॲड.प्रणित डिकले आदी उपस्थित होते. 


पाकिस्तानला नमविण्याची संधी घालवली !

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सशस्त्र हल्ला चढविला. यावेळी पाकिस्तानला नमविण्याची मोठी संधी चालून आली होती. मात्र भारताने ती घालविली असल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे मोदींनी ते कारवाई का थांबविली ? ट्रम्प यांनी घोषणा का केली ? असे म्हणत केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले. 

 
Top