धाराशिव/ तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिवसह तिर्थक्षेञ तुळजापूर शहर व परिसरास विजांचा कडकडाटात बुधवार दुपारी एक तास वादळवा-यासह मुसळधार पाऊस झाला.
21 मे रोजी दुपारी पावसास आरंभ झाला. या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. तर घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. या पावसात भाविकांना भीजत दर्शन घ्यावे लागले. हा वादळवा-या सह पाऊस असल्याने सावलीसाठी लावलेले पडदे उडुन गेले. मंदीर समोर पाणीच पाणी झाले शहरातील अनेक झाडांचे फाटे तुटुन जमिनीवर पडले. शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. एकंदरीत तुफान वादळी वाऱ्यात आलेल्या या पावसामुळे शहरातील किरकोळ व मोठ्या व्यवसायिकांचे देखील नुकसान झाले आहे. या पावसात शेतीचे नुकसान झाल्याचे समजते.
रस्त्यावर पाणी
धाराशिव शहरामध्ये आज अचानक पडलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. समर्थ नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. विशेष म्हणजे धाराशिव नगर परिषदने कोट्यावधी रूपयाला नाला सफाई व शहर स्वच्छतेचे टेंडर दिले आहे. असे असताना जोरदार झालेल्या पहिल्या अवकाळी पावसातच रस्त्यावर पाणी आल्याने शहर स्वच्छतेच्या टेंडरची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.