कळंब (प्रतिनिधी)- 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. अनेक क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे.परंतु अजूनही विज्ञान आणि तंत्रज्ञान यापासून महिला लांब आहेत.एकविसावे शतक म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचे युग आहे आहे.त्यामुळे महिलांनी त्यादृष्टीने अपडेट राहणे तितकेच महत्वाचे आहे.ही गरज लक्षात घेता यावर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेड कडून महाराष्ट्रभर महिला संगणक सक्षमीकरण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण 30 दिवसांचे असून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसाठी ते पूर्णपणे मोफत राहणार आहे.महिलांना डिजिटल संसाधनांचा वापर करता यावा आणि इंटरनेट ऑनलाईनच्या या युगात जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अपडेट राहून हायटेक व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम ग्राम,तालूका तसेच जिल्हा स्तरावर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक स्तरावरील काही निवडक समाजसेवी संगणक संस्था सहकार्य करणार आहे.या नियोजनासाठी नगर जिल्ह्याच्या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा तसेच सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका ॲड.स्वाती जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील समस्त महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सीमा बोके व संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीने केले आहे. यासाठी कळंब तालुक्यासाठी कळंब शहरातील ॲपटेक कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा.संजय घुले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा डॉ. वर्षा जाधव यांनी केले आहे.