तुळजापूर (प्रतिनिधी)- हवा पाणी अन तुळजाभवानी म्हणजे धाराशिव जिल्हा अशी असणारी ओळख आता येथिल कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून देशभर प्रसिद्धीस येत आहेत. याचा प्रत्यय नुकतेच दिल्ली येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुकचे सुपुत्र मुंबई येथील प्रसिद्ध आर्ट डिझायनर खाँजाभाई मौलासाहेब सय्यद यांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी तोंडभरून कौतुक करत सन्मान सत्कार केला.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पाहिलेच सम्मेलन राजधानी दिल्ली येथे पार पडले. साहित्य सम्मेलनाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र राज्य सरकारसह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व सरहद संस्था पुणे यांच्या विद्यमाने तीन दिवशीय सम्मेलनाचा डंका राज्यासह दिल्लीत गाजला. अशा दैदिप्यमान सम्मेलनाच्या सजावटीची मुख्य जबाबदारी तुळजापूर तालुक्याचा गौरव असणारे प्रसिद्ध आर्ट डिझायनर खाँजाभाई सय्यद यांच्यावर होती.त्यांनी केलेल्या सर्व प्रसिद्धीच्या कामामुळे या सम्मेलनाला एका वेगळ्या उंचीवर पोचवले.
राजधानीत साहित्य सम्मेलनाची घोषणा होताच नेटक्या नियोजनाची सर्वच स्तरांवर जोरदार तयारी सुरू झाली,यावेळी सम्मेलनाची निमंत्रण पत्रिका, स्वागत कमानी,विचारपीठावरील मुख्य बॅनर आदी बाबींसाठी एकमेव नाव संयोजक समितीच्या समोर आले. सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी खाँजाभाई सय्यद यांचे नाव सुचवले याला सर्वानुमते होणार मिळाला,याबाबत संस्थेने खाँजाभाई सय्यद यांना ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले. सय्यद यांनी मराठीचा होणारा बहुमान यासाठी आपलाही हातभार लागावा यासाठी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
याच क्षणापासून गेली तीन महिने अथक परिश्रम करत सय्यद यांनी उत्कृष्ट अशी निमंत्रण पत्रिका, स्वागत कमानी,विचार व्यासपिठावरील फलक तयार केले. यासर्व कार्याची सम्मेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी,स्वागत अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व साहित्य प्रेमींनी भरभरून कौतुक केले.
सम्मेलनाच्या ठिकाणी
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये 98 वे साहित्य सम्मेलन पार पडले,याठिकाणी तब्बल 99 बाय 8 फुटांचा भव्य असा स्वागतबॅनर, 50 बाय 20 फुटांच्या दोन भव्य स्वागत कमानी,61 बाय 17 फूट उंचीचे ग्रंथनगरीची स्वागत कमान,मुख्य कमान, छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी,साहित्य सम्मेलनाचे आजवरचे 97 पूर्व अध्यक्ष बॅनर,नोंदणी कक्ष बॅनर,मराठीत निवडक ग्रंथांची प्रतिकृती, विविध सभामंडपाचे बॅनर,याशिवाय दिल्ली महानगरात मुख्य मार्गावर संमेलननाचे फलक झळकत होते.
अविस्मरणीय अनुभव
दिल्लीत पार पडलेले साहित्य सम्मेलन मराठीच्या अभिजात दर्जा अधोरेखित करणारे होते,या सम्मेलनाचे केलेले काम आजवरच्या केलेल्या कामांत सर्वोच्च असून मराठी भाषेची केलेली सेवा होती,हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
खाँजाभाई सय्यद, आर्ट डिझायनर मुंबई