धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला आहे. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या या प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी आता दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. संबंधित विभागात या प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पाच्या बाबतीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील यांनी वरील माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात 10,000 रोजगार निर्मिती करण्याचा आपला निश्चय आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करीत जनतेने पुढील काळात प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असेही त्यांनी सांगितले. 2019 साली आपण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेले प्रमुख 5 विषय घेऊन त्यातून सर्वांगीण विकासाला चालना देणे व मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आखणी केली होती. यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्दैवाने अडीच वर्षाच्या कालावधीत याबाबत कांहीही सहकार्य मिळाले नाही. मात्र 2022 साली आपल्या महायुती सरकारने तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी आवश्यक ते निर्णय घेत हे प्रमुख प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्राथमिक निधीसह कामाचे नियोजन देखील केले आहे.
वरील प्रमुख पाच प्रकल्पांसह 35,000 रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या एकूण 15 महत्वाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. तामलवाडी औद्योगिक वसाहतीत दीडशेहुन अधिक मध्यम व लघु उद्योग उभारण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना देण्यावर आपला भर राहणार आहे. नळदुर्ग येथे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे., होर्टी येथे औद्योगिक वसाहत उभारून रोजगारनिर्मिती, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करणे, कौडगाव येथे देशातील पहिले स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणे, श्रीक्षेत्र येरमाळा येथे विकास आराखडा राबवून धार्मिक पर्यटनाला चालना देणे, शिराढोन तालुका कळंब येथे औद्योगिक वसाहत उभारणे, येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्र व अभयारण्य विकास करून पर्यटनाला चालना देणे, सिद्धेश्वर वडगाव येथील औद्योगिक वसाहती मध्ये रोजगार निर्मिती करणे, तेर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती यासह स्वयंरोजगाराच्या इतर शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्यक्रम निर्धारित करण्यात आले आहेत. त्यासाठी दर पंधरा दिवसांना या सर्व प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीसाठी कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक जाधव, प्र.अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, एमआयडीसी चे विभागीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा डोमकुंडवार, तहसीलदार अरविंद बोळंगे, माया माने, जगताप यांच्यासह पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहने, जलसंपदा विभागाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी,वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वडगाव(सी) एमआयडीसीत लघु व सूक्ष्म उद्योगासाठी पार्क
वडगाव(सी) एमआयडीसीत 90 हेक्टर जमीन संपादित केली आहे.त्यापैकी 150 एकरचा औद्योगिक वापर करण्यात येणार आहे.यात 75 एकर जमिनीवर लघु व सूक्ष्म उद्योग पार्क उभारण्याचे तत्वतः ठरले आहे.या पार्क मध्ये गुंतवणूक करून ज्यांना लघु व सुक्ष्म उद्योग उभे करायचे आहेत अशा इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्याकडे नोंदणी करावी.पुढील आठवड्यात या सर्व इच्छुक उद्योजकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाणार आहे.जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या या विकास प्रक्रियेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.