धाराशिव (प्रतिनिधी) - वार्ड क्रमांक 11, नगर परिषद शाळा क्रमांक 3 व सांजा रोड जवळील शौचालय बंदावस्थेत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शौचास जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेच्यावतीने बांधलेली शौचालय ही फक्त शोभेची वस्तू बनली आहेत. त्याचा वापर करता येत नसल्यामुळे असून अडचण अन् नसून खोळंबा याप्रमाणे अवस्था या शौचालयाची झाली आहे. त्यामुळे ती शौचालय तात्काळ सुरू करावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना दि.25 नोव्हेंबर रोजी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आम्ही वार्ड क्र. 11 येथील रहिवाशी असून त्या ठिकाणी नगर परिषद शाळा क्र. 3 येथे नगर परिषदेचे शौचालय असून त्याची दुरावस्था झाल्यामुळे ते बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे या वार्डातील नागरिकांचे शौचासाठी जाण्यास हाल होत आहेत. विशेष म्हणजे महिला व विद्यार्थीनी यांना शौचास जाण्यास कुठलाही मार्ग नसल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचास जावे लागत आहे. तर सांजा रोड येथे शौचालय चालू अवस्थेत आहे. परंतू त्या ठिकाणी पाणी व स्वच्छता नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक जाण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नगर परिषदेच्यावतीने एक व्यक्ती नेमण्यात येऊन पाणी व स्वच्छता करुन ते शौचालय चालू करण्यात यावे. त्या दोन्ही ठिकाणांची शौचालये तात्काळ चालू करण्यात यावीत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलन दरम्यान काही अनूचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा दिला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिजीत पतंगे, अभिषेक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, रोहित जाधव, गीता पवार, रेश्मा जाधव, अरुणा घोडके, मनीषा देवकर, नंदा जाधव, लता जाधव, शरद पवार रुक्मिणी जाधव यांच्यासह या परिसरातील महिला व पुरुषांच्या सह्या आहेत.