धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवून समाज व राष्ट्राचा विकास करण्यात संशोधकांनी अनमोल योगदान दिले आहे, देत आहेत. त्यामुळे सामाजिक व औद्योगिक विकासात संशोधकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय “आविष्कार” संशोधन व नवोपक्रम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपपरिसर संचालक प्रा. प्रशांत दीक्षित, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे,  आविष्कारचे मुख्य समन्वयक  डॉ. भास्कर साठे, युनिक संचालक डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. आनंद देशमुख, डॉ. सादिक बागवान, जिल्हा समन्वयक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. महेशकुमार माने यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की, चार भिंतीमध्ये झालेले संशोधन समाजासाठी उपयुक्त ठरावे यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांचा वेध घ्यायला हवा. त्यासंदर्भात सातत्याने विचार करावा. त्यामाध्यमातून सूचणार्य़ा कल्पनांचा संशोधनात अवलंब करावा, असेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील नावीन्यता आणि चालू घडामोडींबद्दल मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांमधील सुप्त नावीन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्कार व्हावा, त्यांच्यामध्ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्यांना अधिछात्रवृत्तीच्या स्वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे 2006 पासून ‌‘आविष्कार' या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा राज्यस्तरीय ‌‘आविष्कार' डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जानेवारी 2025 मध्ये संपन्न होणार आहे. यासाठी जिल्ह्यातून विद्यापीठस्तरावर आविष्कार महोत्सव घेऊन 48 संशोधकांचा अंतिम संघ राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पाठवला जाणार आहे. यानिमित्ताने धाराशिव जिल्ह्याचा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात कुलगुरू प्रा. विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रा.वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर  यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 40 महाविद्यालयातील 117 संघांनी-150 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पोस्टर्स व मॉडेल्सचे सादरीकरण केले. यात सहभाग नोंदवला. दुसऱ्या सत्रात निवडक स्पर्धकांचे पीपीटी सादरीकरण घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे यांनी केले तर डॉ. महेशकुमार माने यांनी आभार मानले. हा संशोधन महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे, प्रा. सचिन बस्सैये, डॉ. एम. के. पाटील, प्रा. वरून कळसे तसेच विद्यापीठ उपपरिसरातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

 
Top