धाराशिव (प्रतिनिधी)- वेळेवर अवयव न मिळाल्याने भारतात दरवर्षी जवळपास पाच लाख लोकांचा मृत्यू होतो.यातील दोन लाखांवर लोकांचा हा लिव्हर खराब झाल्यामूळे,पन्नास हजार लोकांचा ह्रदय तर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा किडनी न मिळाल्यामुळे मृत्यू होतो.हे मृत्यू थांबविणे समाजाच्या हाती असून समाजाने अंगदानाबददलचे गैरसमज टाळून अंगदानाची चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी बोलत होते.जनजागृती रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे,पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. 

अंगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी भारत सरकार निर्देशानुसार 11 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान कार्यक्रम राबविण्यात आले.वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी,निबंध,पोस्टर, घोषवाक्य,कविता,पथनाटय असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे पुढे म्हणाले की, भारतामध्ये किडनी आणि नेत्र प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने अंगदान ही काळाची गरज आहे. यामुळे समाजाने अंगदानाबददलचे गैरसमज दुर करुन समाजात चळवळ निर्माण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच रुग्णालयातील डॉक्टर,नर्सेस,विद्यार्थी व कर्मचारी यांनी हिपाटायॅसिंस बी चे लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनी अवयवदानाचे महत्व विषद केले.यावेळी धाराशिव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांनी अवयवदान तसेच हिपाटायॅसिस आजारावर आळा घालण्यासाठी वेळीच निदान व उपचार मोफत असल्याचे सांगितले. 

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.श्रीराम जिंतूरकर,आयएमएचे डॉ.सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.अवयवदान कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ.हेमलता रोकडे यांनी नियोजन केले.या कार्यक्रमास शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या डॉ.मनिषा डावरे,जनऔषध वैद्यकशास्त्र विभागातील डॉ.मोहन राऊत,डॉ.गणेश ताठे,डॉ.स्वप्नील सांगळे,डॉ.दिपक निभोंरकर,कर्मचारी प्रमोद गायकवाड,प्रज्ञावंत रणदिवे, अल्लाऊदिदन शेख व वर्षाराणी कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नर्सिंग महाविद्यालयाचे श्री.भांगे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील व जिल्हा रुग्णालययातील सर्व कर्मचारी, सुरक्षारक्षक यांनीही परिश्रम घेतले.

 
Top