धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील लहानात लहान शेतकरी एकत्रित होत आहे. आता हेच कंपन्यांचे जाळे मजबूत होऊन देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनांचा दबदबा तयार करेल. असा विश्वास स्मार्ट प्रकल्पाचे सेवानिवृत्त कृषि संचालक दशरथ तांभाळे यांनी व्यक्त केला आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत शुक्रवारी (दि.28) जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एम. डी. सूर्यवंशी, आत्माचे प्रकल्प संचालक के. आर. सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. असलकर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी अभिमन्यू काशीद, पुरवठा व मूल्य साखळीतज्ञ चेतन जाधव, सीए भैरवनाथ मराठे, शेतकरी कंपन्यांचे सभासद, संचालक आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. तांबळे म्हणाले की, राज्यासह देशातील शेतीची उत्पादकता कमी आहे. हे वास्तव डोळ्यासमोर ठेवून यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या काही वर्षापासून करीत आहोत. त्यासाठी गटशेती सह शेतकरी उत्पादक कंपन्या असा हा प्रवास सुरू आहे. शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यानी एकत्रित येऊन शेती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीच शासनाच्या माध्यमातून गटशेती, पोकरा, स्मार्ट असे प्रकल्प राबविले जात आहेत. देशातील एकूण शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या पाहता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्याच्या कृषी उत्पादनाचा दबदबा देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळेल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान काही वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चांगले काम करता आले. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांना स्मार्ट सारखे प्रकल्प देण्यासाठी काम करता आले. यापुढेही आपण असेच काम करू. शिवाय शेतकऱ्यांनी, कंपन्यांनी एकत्रित येऊन जोमाने काम करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सामूहिक प्रोत्साहन योजना राबविली जाते या योजनेत प्रोत्साहन म्हणून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना शासनाकडून 100% पर्यंत अनुदान दिले जाते. त्यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण करून  जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एम . डी. सूर्यवंशी यांनी केले. दरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवायसी, लेखापरीक्षण, आयटीआर, आदी बाबींची पूर्तता वेळेत करावी. अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते. अशा सर्व बाबींचा उलगडा सीए भैरवनाथ मराठे यांनी कंपन्यांच्या सदस्यांना केला. कंपन्यांची व्यवस्थापन कसे असते, याबाबत उदाहरण देत उपविभागीय कृषी अधिकारी एमके असलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्या शेतीत रासायनिक खतांचा मारा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आयुष्यमान धोक्यात येऊ शकते. त्यासाठी शासनाकडून सेंद्रिय शेतीची संकल्पना राबवली जात आहे. गेल्या दोन वर्षात सेंद्रिय शेतीचे गट तयार झाले तर यंदाच्या वर्षापासून सेंद्रिय शेतकरी कंपन्या तयार केल्या जात आहेत. शिवाय त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासह आत्मा विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रकल्प संचालक सराफ यांनी दिली. तर स्मार्ट प्रकल्पातील कंपन्यांनी अभिलेखे जतन करून ठेवावेत. त्यामध्ये अवक-जावक, इतिवृत्त, अभिप्राय, तक्रार अशा प्रकारची रजिस्टर ठेवणे गरजेचे आहे. तसेच सर्व प्रकारचे पत्रव्यवहारही जतन करून ठेवावेत. असा सल्ला मूल्य साखळी तज्ञ चेतन जाधव यांनी दिला. कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून कपिल जोशी, बळीराम बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यु काशीद यांनी केले. तर चेतन जाधव यांनी आभार मानले.

 
Top