धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे झाले असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मतदारसंघाचे नाव हे उस्मानाबाद असेच असणार आहे. उस्मानाबाद लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असून, महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे तर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. 1951 ते 2019 या दरम्यान 17 वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. 2024 ची ही निवडणूक 18 वी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ युतीला मिळतो का? महाविकास आघाडीमधील शिवसेनेला मिळतो? हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा आणि लातूर जिल्ह्याती औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तब्बल 11 वेळेस तर शिवसेनेने 5 वेळेस विजय मिळविला. तर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला  1 वेळेस विजय मिळविता आला आहे. अरविंद कांबळे हे उदगीरचे होते. परंतु जुना उस्मानाबाद जिल्हा म्हणून ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्यामुळे सर्वाधिक 4 वेळेस खासदार राहिले. तर तुळशीराम पाटील हे सलग 3 वेळेस विजयी होऊन हॅट्रीक केली. तर शिवसेनेचे शिवाजी कांबळे 2 वेळेस खासदार राहिले. तुकाराम श्रृंगारे हे 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात पंतप्रधान चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय राज्यमंत्री होते. या काळात उस्मानाबाद जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर मात्र शिवसेनेने या मतदारसंघात पाय रोवले. 1989 साली शिवसेनेने पहिल्यांदा यशवंत मारुती पेठे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांना 78,414 मते मिळाली. त्यानंतर 1996 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा उस्मानाबाद लोकसभेवर विजय मिळविता आला. शिवाजी विठ्ठल कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा 15 हजार 919 मतांनी पराभव केला. शिवसेनेने आजवर 5 वेळेस विजय मिळविला असून, कल्पना नरहिरे, रविंद्र गायकवाड, ओम राजेनिंबाळकर शिवसेनेचे खासदार राहिले.

शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या 2004 साली सर्वात कमी 1 हजार 649 इतक्या मताने विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लक्ष्मण ढोबळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. 2009 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांचा 6 हजार 787 मतांनी पराभव केला. तर 2014 साली शिवसेनेचे रविंद्र गायकवाड हे सर्वाधिक 2 लाख 34 हजार 325 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. सर्वाधिक फरकाने निवडून येण्याचा विक्रम त्यांचे नावे आहे. 2014 गायकवाड यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून माजीमंत्री पद्मसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री मोदी यांचा मतदारसंघात प्रभाव असला तरी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार लढत दिली. लढतीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना औसा मतदारसंघाने तारले. ओमराजे विरुध्द त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले राणाजगजितसिंह यांच्यात लढत झाली. यात ओमराजे यांना सर्व सहा मतदारसंघात आघाडी मिळाली. त्यात सर्वाधिक आघाडी औसा येथे 53 हजार 504 मते मिळाली. ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 (10.06 टक्के) अधिक मते घेऊन विजयी झाले.

आगामी लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावरून महायुती व आघाडीमधील घटक पक्षामध्ये रस्सीखेच चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांची उमेदवार फायनल आहे. तर महायुतीमध्ये मात्र अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप तिन्ही पक्ष या मतदारसंघावर दावा करीत आहेत. सर्वांधिक भाजपमधून इच्छुकांची संख्या जास्त आहे. येत्या काही दिवसात महायुतीमधील उमेदवार फायनल होवून चित्र स्पष्ट होईल. 


 
Top