धाराशिव (प्रतिनिधी)-प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप 2020, 2021, 2022 व 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे असलेले रु.769 कोटी मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असून या दुष्काळी परिस्थितीत सदरील रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी बारुळ ता. तुळजापूर येथे बोलताना केले. महाशिवरात्री निमित्त श्री बाळेश्वराचे दर्शन घेऊन येथील विकास कामांचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने खरीप 2020 मधील नुकसानी पोटी रुपये 545.89 कोटी शेतकऱ्यांना वितरित करणे अपेक्षित असताना आजवर केवळ रुपये 288.77 कोटीच वितरित केले आहेत. तसेच खरीप 2021 मध्ये देखील प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत केवळ रुपये 374.34 कोटीच वितरित केले आहेत. मात्र प्रत्यक्ष झालेल्या नुकसानी प्रमाणे आणखीन रुपये 374.34 कोटी वितरित करणे प्रलंबित आहे. ठाकरे सरकारच्या असहकार्यामुळे या दोन्ही विषयात न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु आहे.

बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी प्रमाणेच भारतीय कृषी विमा कंपनीने देखील खरीप 2022 च्या नुकसानी पोटी चुकीच्या पद्धतीने 50% भारांकण लावून नुकसान भरपाई वितरित केली होती, मात्र आपल्या सरकारच्या कठोर भूमिकेनंतर उर्वरित 50% टक्के रक्कम रु 282 कोटी वितरित करण्यास विमा कंपनीने सुरुवात केली व यातील रुपये 230 कोटी वितरितही करण्यात आले आहेत. शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाईची रक्कम 110% हून अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे. सदरील रक्कम प्राप्त होताच उर्वरित रुपये 50 कोटी वितरण करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे व ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

सन 2023 मधील 25% अग्रिम प्रमाणे रु.253 कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित केली असून उर्वरित रक्कमेचे वितरण सुरू आहे. तसेच काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या आलेल्या साधारण 1,92,000 तक्रारीच्या अनुषंगाने एकापेक्षा जास्त जोखीम बाबींच्या नुकसान भरपाईच्या परिगणनेसाठीचे सूत्र (formula) पीक विमा पोर्टलवर उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत शासन स्तरावरून सुत्र प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यानुसार खरीप हंगाम 2023 मध्ये अधिकचे साधारणत: रु.100 कोटी मिळणे अपेक्षित आहेत.

अशाप्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे खरीप 2020 मधील रु.244.93 कोटी, खरीप 2021 मधील रु.374.34 कोटी, 2022  मधील रु.50 कोटी व खरीप 2023 मधील जवळपास रु.100 कोटी असे आणखीन एकूण 769 कोटी मिळणे अभिप्रेत असून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, बाजार समिती सभापती सचिन पाटील, विक्रमसिंह देशमुख, दीपक आलुरे, वसंत वडगावे, विजय शिंगाडे, सरपंच शहाजी सूपनार,उपसरपंच राजकुमार वट्टे, यावलकर साहेब,  संजय ठोंबरे, बाबुराव ठोंबरे, सुनील नवगिरे, सुभाष पाटील, नवीलाल शेख यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते.


 
Top