धारशिव (प्रतिनिधी) -शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव तालुक्यातील पळसप येथील स्व. वसंतराव काळे साहित्य नगरीत शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी 9 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात कथाकथन कार्यक्रम रंगला. ग्रामीण बाजाच्या कथांचे सादरीकरण करून साहित्यिकांनी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले.
कथाकथन सत्राच्याअध्यक्षस्थानी गेणू शिंदे (छत्रपती संभाजीनगर) हे होते. यात राम तरटे (नांदेड), बबन शिंदे (हिंगोली), वैजिनाथ अनमुलवाड (नांदेड) यांनी सहभाग घेतला. मंचावर संमेलनाच्या अध्यक्ष अंजली धानोरकर, स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.
वैजिनाथ अनमुलवाड (नांदेड) यांनी “हिकमत“ ही कथा खास विनोदी शैलीत सादर केली. शेतकरी जीवनावर आधारित बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव त्यांनी मांडले. शेती गर्क व्यवसाय आधुनिकतेमुळे, जागतिकीकरणामुळे, तोट्यात असल्याची चर्चा नेहमीच होते. सदानंद या शेतकऱ्याचा सालगडी असलेला सायबू उदाने हा अत्यंत हिकमती आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायाशी संबंधित त्याचे कार्य प्रेरणादायी आहे. समाज प्रबोधन आणि गाव ग्रामीण संस्कृतीचे बारकावे इत्यादी संदर्भ या कथेतून त्यांनी मांडले.
राम तरटे यांच्या “ बारा आण्याची बोंब“ कथेने रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. आपल्या सखीला रंग लावण्यासाठी कथेतील नायकाची तळमळ आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक उपाचाती यातून हास्य विनोदाचे फवारे उडाले. गावातील एका तरुणाने पाटलाच्या मुलीचं आणि गावातील एका दलीत पोराच्या लफड्यावर बोंबलण्यासाठी बारा आणे दिले आणि नायक व त्याच्या मित्रांनी त्या तरुणाने संगतील्या प्रमाणे बोंब मारली आणि गावात हाणामारी झाली. दोन्हीकडाचे लोक रक्त बंबाळ झाली.गावातली माणसं एकोप्याने राहणारी एकमेकावर तुटून पडली. गावातली माणुसकी आणि एकी संपली. त्यामुळे नायक खजील होऊन बसला असता नायिका त्याच्याजवळ येऊन म्हणाली , 'मला रंग लावण्यासाठी तू जे जे केलस ते ते सारं मला भग्यानी सांगलय. या उचापती करण्यापेक्षा पाण्यात हात बुडवून जरी मला लावला असतास तर कृष्ण राधेची रंग पंचमी झाली असती. परिक तुझ्या बारा आण्याच्या बोंब न राम्या गावात माणुसकीची बोंबाबोंब केली. माणुसकी मेली.“ आणि त्याची सखी नाराज होऊन निघून गेली..विनोदातून गंभीरतेकडे जाणारी कथा रसिकांची दादा मिळवून गेली.
कथाकथन सत्राचे अध्यक्ष गेणू शिंदे यांनी “पुनर्जन्म“ ही ग्रामीण कथा सादर केली. तात्या नामक वृद्ध शेतकऱ्याच्या भोवती फिरणारी ही रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. तात्या, भरत आणि पार्वती ही कथेतील पात्रे शिंदे यांनी रसिकांच्या डोळ्यासमोर जिवंत केली. वृद्ध तात्यांचे शेतीवर असलेले जीवापाड प्रेम, मुलगा भरत शाळा बुडवून जीपगाडी चालवतो. अशी गुंफण या कथेतून करण्यात आली. अखेर भरतचा झालेला अपघात आणि त्याला वाचविण्यासाठी तात्याची धडपड, दवाखान्यासाठी शेती विकावी लागते.. अखेर भरत शेतीच केली पाहिजे, असा आशावाद निर्माण करणाऱ्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
कथाकथन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री पिसे यांनी केले. आभार राजकुमार मेढेकर यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाड्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी रसिक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.