धाराशिव (प्रतिनिधी) - हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कोणत्याही मोठ्या व्यक्तींने पुढाकार घेतला नव्हता. तर तो सर्वसामान्य माणसाने घेतला होता. कारण त्यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. त्यामुळे त्यांना शतदा नमन केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. तर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यामध्ये स्वतःला झोकून तर दिलेच त्याबरोबरच त्यांनी लोकांच्या स्वातंत्र्याचा संसार उभा केला असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक राधाकृष्ण मुळी यांनी दि.17 सप्टेंबर रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती उस्मानाबाद, धाराशिव प्रशाला धाराशिव, श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नी व वारसांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाशराव मालखरे तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा, संयोजन समितीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, चित्राताई मालखरे, दिलीप गणेश, उमाजी देशमुख, संतोष नलावडे, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुळी म्हणाले की, हैद्राबाद एक बंदिस्त जिल्हा होता. या जिल्ह्यात बाहेरची हवाच येत नव्हती. त्यामुळे त्या संस्थानातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी खेड्यापाड्यांतील पुरुषांसह महिलांनी मोठा लढा उभारला व तो जिंकला. तर लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी काम केले. त्या माध्यमातूनच त्यांचे मराठवाड्याला पाय लाभल्याचे त्यांनी सांगितले. कारण त्यांचा जन्म गुलबर्गा जिल्ह्यात तर त्यांचे शिक्षण सोलापूर येथे झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा अतिशय मोठा प्रभाव झाल्यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी खर्च केले. विशेष म्हणजे हिप्परगा येथील शाळेत त्यांना महिन्याला 60 रुपये पगार दिला जात असलेला पगार देखील त्यांनी ती शाळा सोडताना शाळेमध्ये जमा केला. पोलीस ऍक्शनमध्ये सोलापूर येथून आलेले सैन्य नळदुर्गपर्यंत आले व तेथे लढा झाला. या लढ्यामध्ये कृष्णात सिंग व होशनाथ सिंग अग्रेसर होते. या लढ्यात होशनाथ सिंग यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यामुळे होशनाथ सिंग हे भारत सरकारच्या पहिल्या मरणोत्तर अशोक चक्राचे मानकरी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे कासिम रजवीला इतिहास विसरला. मात्र स्वामी रामानंद तीर्थ यांचा इतिहास कधीही विसरणार नसून तो कायम स्मरणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर पन्नालाल सुराणा म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला असताना देखील मराठवाड्यावर निजाम व इंग्रजांचे जोखड होते. या भागातील जनतेस स्वातंत्र्याचा हक्क मिळाला नव्हता. स्वातंत्र्य मिळण्याऐवजी त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केला जात असल्यामुळे येथील जनतेने निजामाविरुद्ध लढा पुकारला. सुरुवातीच्या काळात शांततेच्या मार्गाने हा लढा लढला गेला. मात्र निजाम सैन्याकडून प्रचंड अत्याचार होऊ लागल्याने संपूर्ण जनता निजामाच्या विरोधात गेली. त्यामुळे निजामाला जनादार राहिला नाही. निजामाने जनजागृती करणाऱ्या मराठी वर्तमानपत्र व पुस्तके साहित्यावर बंदी केली होती. त्यामुळे सर्वांनी स्वाभिमानी होण्यासाठी जो लढा दिला तो खरोखरच वाखाण्याजोगा असल्याचा त्यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या पत्नी व वारस यांचा सन्मान चिन्ह, शाल, बुके देऊन येथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उमाजी देशमुख यांनी तर सूत्रसंचालन रवी केसकर यांनी व उपस्थितांचे आभार ऍड.सुग्रीव नेरे यांनी मानले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी, त्यांचे वारस व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.