धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील केशेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन 2022-23 या आर्थीक वर्षाची 26 वी अधिमंडळाची वार्षीक सर्व साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. 24/09/2023 रोजी कारखाना साईट, अरविनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली.

कारखाना कामकाजास सुरुवात करणेपुर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत श्री. गोरे यांनी केले. तद्नंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी सभेच्या विषय सुचीचे वाचन केले. सभेच्या कामकाजास सुरुवात करणेपुर्वी अहवाल सालात दिवगंत झालेल्या व्यक्तींना श्रध्दाजंली वाहणेत आली. त्यानंतर श्री. अरविंद गोरे यांनी सभेच्या कामकाजास सुरुवात करुन सभेपुढे मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी अरविंद (दादा) गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, आपल्याकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने आपणांस सतत ऊस व पाणी टंचाई जाणवते. परंतु आपण वेळोवेळी या संकटावर मात करत आलो आहोत. ऊसामध्ये 70 टक्के पाणी उपलब्ध असते याचा विचार करता कारखान्याने ऊसातील पाण्याचा पुन:र्वापर करण्यासाठी यंञ सामुग्री बसविलेली आहे. ऊसातील 70 टक्के निघणारे पाणी हे को-जन. व डिस्टीलरी प्रकल्पासाठी वापरणेत येते. तसेच बॉयलींग हाऊसमधील गटरमधुन वाया जाणाऱ्या पाण्याचे फिल्ट्रेशन करुन व त्याचे तापमान वाढवुन पुन्हा मिल इम्बिबीशनसाठी वापर या हंगामात करणार आहोत. मिलवरील धुतलेले पाणी व कुलींगचे वाया जाणारे पाणी तसेच बॉयलर ब्लो डाऊनचे पाणी बॉयलरच्या वेट स्क्रबरसाठी त्याचा वापर करत आहोत. स्प्रे पॉण्डचे ओव्हर फ्लो होणारे पाणी ईटीपीला घेवुन त्यावर प्रक्रिया करुन त्याचा शेतीसाठी वापर चालु आहे. आसवाणी प्रकल्पातील निघणाऱ्या पाण्याचा पुन:र्वापर करणेसाठी सी.पी.यु. प्रकल्प उभा केला असुन त्यातुन निघणारे 60 टक्के पाणी कारखाना प्रोसेससाठी तर 40 टक्के पाणी शेतीसाठी वापरणेत येणार आहे. यामुळे कारखान्याला लागणाऱ्या पाण्यात बचत होणार आहे. त्यामुळे शुन्य प्रदुषण साध्य होवुन “झिरो इनटेक व झिरो डिस्चार्ज“ ही संकल्पना अमंलात आणली जाणार आहे.

साखरेच्या दरातील चढ उतारामुळे तसेच शासनाने साखर निर्यात बंदी केल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व साखरेचा दर पाहता एफ.आर.पी प्रमाणे ऊस दर देणेस कारखान्यांना अडचणी येत आहेत. सध्या पाऊस नसल्याने ऊस उत्पादनात घट झाली आहे. अशातच गुळ पावडर कारखान्याचे वाढलेले प्रमाण, कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता याचा विचार करता कारखाने 100 दिवसही चालणार नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊस तोडीस घाई न करता विचारपुर्वक कारखाना निवडुन ऊस पुरवठा करावा.

पाणी टंचाईचा विचार करता शेतकऱ्यांनी कमी पाण्यात कमी खर्चात जास्त उत्पादन घेणेचेदृष्टीने शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील हंगामासाठी खोडवा चांगल्या पद्धतीने राखणेसाठी कारखान्यामार्फत खोडवा व्यवस्थापण कार्यशाळा आयोजीत करणेत येणार आहेत. कार्यक्षेत्रात बहुसंख्य महिला शेती करत असुन त्यांना ऊस शेतीविषयी मार्गदर्शन करणेसाठी शेती विभागात महिला कर्मचारी नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक ॲड. निलेश पाटील यांनी सभा संपलेचे जाहीर करुन उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.


 
Top