माधव सुर्यवंशी
उमरगा (प्रतिनिधी)- भारत कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्या बेरोजगारीने कळस गाठला आहे. अशात शेती व्यवसाय तरुण शेतकर्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. मात्र, शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत आहे. शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात अधिकार्यांमध्येही उत्साह दिसून येत नसल्यामुळे शेतीबद्दल उदासीन अधिकारी शेतीला तारणार? असा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
उमरगा तालुक्यात 58 हजार 50 शेतकरी संख्या असून यात 46 हजार 665 अल्प भूधारक, 11 हजार 889 अत्यल्पभूधारक शेतकर्यांचा समावेश आहे. तालुक्याची वार्षिक 799 मिमी पावसाची सरासरी आहे.तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते. जमिनीचे मर्यादित क्षेत्र उपलब्ध असून सिंचन सुविधा मुबलक नसल्याने या क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.
कृषी केंद्र चालकांना मार्गदर्शनाची गरज!
तालुक्यात जवळपास 150 कृषी केंद्रे आहेत. या केंद्रांमधून शेतकर्यांना शेतीसाठी लागणारी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा पुरवठा केला जातो. परंतु, कृषिकेंद्र चालकांना शेती विषयक अभ्यास आहे का ? त्यांना कीटकनाशके, खते कोणती वापरावीत? त्यांचा किती प्रमाणात वापर करावा ? कीड आल्यास त्यावरील उपाययोजना ? या विषयी माहिती आहे का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे कृषिकेंद्र चालकांची देखील कार्यशाळा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची कृषी विभागाला गरज आहे.
तालुक्याचे क्षेत्र व शेतकरी संख्या!
तालुक्यात 96 गावातील एकूण 98 हजार 682 हेक्टर इतके भौगोलिक क्षेत्र आहे. यापैकी 87 हजार 244 हेक्टर इतके क्षेत्र लागवडी योग्य आहे. यात खरिप 79 हजार 677.41 हेक्टर, रब्बी 41 हजार 415 हेक्टर, उन्हाळी पिके 196.6 हेक्टर, सिंचित 10 हजार 192 हेक्टर, पडित 1 हजार 610 हेक्टर, वनक्षेत्र 863 हेक्टर आहे. तर उर्वरित अंदाजे 987.36 हेक्टर क्षेत्र फळपिकाखाली आहे.