धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतःची प्रगती व उन्नती करण्या सोबतच सन्मानाने जगणे हा तृतीयपंथीयांचा हक्क आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चासत्रात केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संजय गुरव, महाराष्ट्र उद्योजक्ता विकासाचे प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बडे, व्यवस्थापक एन.पी जावळीकर, संजय गांधी निराधार योजनेचे प्रभारी तहसीलदार एस.एन भिसे, माया श्रीपती दामोदर पानसे,श्रावण शिवाजी वैरागे, राजनंदिनी अरूण बनसोडे, उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील सर्व तृतीय पंथीयांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये बँक अकाउंट उघडण्याबाबत सूचना केल्या. या बैठकीमध्ये प्रामुख्याने तृतीयपंथीयांचे रेशन कार्ड आणि संजय गांधी निराधार योजनेतून प्रति महिना 1000 रुपये वेतन तसेच इतर आवश्यक दाखले घेण्यासाठी शुक्रवारी 7 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबीर घेण्याचे आदेश दिले. या शिबीराच्या माध्यमातून तृतीय पंथियांना दिवसभर विविध दाखले, योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी प्रशासन कार्यरत राहणार, या योजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीय पंथीयांनी आपला आधार कार्ड आणि तृतीय पंथी असल्याचा प्रमाणपत्र सोबत आणावा असे आवाहन जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी केले.