धाराशिव / प्रतिनिधी-
आताच्या पिढीला पक्ष्यांचा किलबिलाट दुर्मिळ होत चाललाय. चिमणी व घराभोवतीचे छोटे छोटे पक्षी ज्यांना स्वतःचे घरटे बनवण्यासाठी आधाराची, एखाद्या कोपर्याची गरज असते. तोच आधार देण्यासाठी आणि उस्मानाबाद शहरातील चिमणी व इतर छोट्या छोट्या पक्ष्यांची संख्या थोडीतरी वाढावी, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी श्रीपतराव भोसले माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे बनवण्याची कार्यशाळा
पार पडली. या कार्यशाळेत 150 विद्यार्थ्यांनी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक प्रा.मनोज डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेऊन पक्ष्यांसाठी 510 कृत्रिम घरटी बनवली. ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत होती. सदरील कृत्रिम घरटे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य कार्यशाळेत विद्यालयातर्फे उपलब्ध करुन दिले गेले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण तज्ज्ञ, पक्षीसंवर्धनाचे प्रणेते डाॅ.सलीम अली यांच्या प्रतिमेचे पूजन करुन युवा उद्योजक तथा भाजपा नेते अभिराम पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ.दयानंद जटनुरे, संस्थेचे संचालक संतोष कुलकर्णी, गुरुवर्य के.टी.पाटील फाऊंडेशनचे प्रमुख प्रा.विनोद आंबेवाडीकर यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरूवातीला प्रा.मनोज डोलारे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तसेच श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च विद्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती सांगितली.
प्राचार्य डाॅ.जटनुरे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुक्या जीवांसाठी आपण काहीतरी करतोय ही जाणीवच विद्यार्थ्यांसाठी खूप आनंददायी आहे. असा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवून पक्षीसंवर्धनाची ही चळवळ जनमानसात रुजवू असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी पक्ष्यांचे पर्यावरण संतुलनातील महत्त्व सांगून पक्षीसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच पक्ष्यांची कमी होणारी संख्या ही चिंतेची बाब असून यासाठी विद्यालयामार्फत असे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार असल्याचे मत व्यक्त केले. शेवटी प्राचार्य साहेबराव देशमुख यांनी तुम्हीही वापरात नसलेली खोकी, बाटल्या यांपासून घरटी बनवू शकता. मात्र एक खबरदारी घ्यावी लागेल, जिथे पाऊस लागणार नाही व जिथे कायम सावली असेल अशा ठिकाणीच (बाल्कनी, खिडक्या, पोर्च, व्हरांडे) उंचावर ही घरटी लावावीत, असे आवाहन केले. कार्यशाळेत प्रा.मनोज डोलारे यांनी सर्वांना कृत्रिम घरटे कसे बनवायचे याची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहाने प्रतिसाद देत अतिशय सुरेख घरटी बनवली. हे बघून मान्यवरांनाही घरटी बनवायचा मोह आवरला नाही. त्यांनीही विद्यार्थ्यांसोबत घरटी बनवली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन संदीप जगताप तर आभार प्रा.शितलकुमार ऐवळे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी प्रा.विवेक कापसे, प्रा.प्रसाद माशाळकर, शिवाजी भोसले यांनी परिश्रम घेतले.