धाराशिव / प्रतिनिधी-

महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील वर्ग 1 मधील जमिनी वर्ग 2 मध्ये घेतल्याच्या प्रकरणात सदरील जमिनी पूर्ववत मूळ मालकाच्या नावे करण्यात  येणार असल्याची माहिती  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गुरुवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे व कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

  गुरुवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्ग 1 च्या जमिनीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, विनोद गपाट, उमेश राजे, अ‍ॅड. दीपक आलुरे आदी उपस्थित होते.

 बैठकीत वर्ग 2 मध्ये घेतलेल्या जमिनी पूर्ववत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महसूल प्रशासनाने शेतकर्‍यांना दंडाच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. एवढी मोठी रक्कम गोरगरीब शेतकर्‍यांना भरणे अशक्य असल्याचे महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली असल्याची माहिती श्री. शिंगाडे यांनी दिली.

 महसूल प्रशासनाने वर्ग 1 एकच्या जमिनी वर्ग 2 मध्ये घेतल्याच्या प्रकरणात शेतकरी बचाव कृती समितीने आक्रोश मोर्चा, उपोषण आंदोलन करुन शेतकर्‍यांच्या मागणीकडे लक्ष वेधले होते. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला यश आल्याचे श्री. शिंगाडे यांनी म्हटले आहे.


 
Top