उस्मानाबाद /प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल व क्वीक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26.12.2022 ते दि. 01.01.2023 या सप्ताहा दरम्यान सायबर गुन्हेगारी विरोधी जनजागृती करण्यासाठी जिल्हाभरात पथनाट्य सादर केली जात आहेत. याचा शुभारंभ पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. 

सध्याचे युग इंटरनेटचे असून जवळपास घरोघरी स्मार्टफोनचा वापर होत आहे. परंतु काही लोकांच्या अज्ञानीपणाचा गैरफायदा घेउन ऑनलाईन लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांचे यातून चांगलेच फावले आहे. बँक ग्राहकांना फोनकरून बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागणे, लिंक पाठवून त्यात ग्राहकास बँक खातेविषयक गोपनीय माहिती भरावयास लावने, त्वरीत कर्ज, सेक्सटॉर्शन, ऑनलाईन समाज माध्यमांत बदनामी करणे यांसारखे अनेक गुन्हे घडत असून हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले आहेत.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाचे चौक, शिक्षण संस्था परिसर अशा सुमारे 100 हुन अधीक ठिकाणी प्रचार रथ व त्यासोबतच्या चमूद्वारे स्थानिक भाषा संस्कृतीचा आधार घेउन सायबर जनजागृती संबंधी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. त्या अनुशंगाने आज दि. 26.12.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्वीक हिल फाउंडेशनच्या सदस्यांसह सायबर पो.ठा. चे पो.नि.- श्री. पटेल, सपोनि- श्री. सुदर्शन कासार यांसह पोलीस अंमलदार उपस्थित होते.

 
Top