उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राज्यातील महिलांना त्यांच्या दारात येऊन न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबध्द असून महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी व कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी समाजाने सुसंस्कारी होणे आवश्यक आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाच्या आढावा बैठकीत श्रीमती चाकणकर बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अघीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज पाटील-गलांडे, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच.निपाणीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधीज्ञा वैशाली धावणे आदी उपस्थित होते.
हरवलेल्या मुलींच्या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत मिसींग सेल सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा त्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे बेपत्ता झालेल्या मुलींची किंवा माहिलांची संख्या या माध्यमांतून सहज मिळवता येणे शक्य आहे, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.
विद्यार्थींनींच्या आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी 1098 व 112 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. जेव्हा एखाद्या महिलेला आपण असुरक्षित आहोत किंवा कुठेतरी अत्याचार होतोय याची माहिती मिळताच तातडीने या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अगदी 10 ते 15 मिनीटांमध्ये पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी पोहचेल व मदत करेल, त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक सर्व माध्यमांतून प्रसारीत करण्याचे आवाहनही यावेळी श्रीमती चाकणकर यांनी केले.
कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी अशा समस्या समाजापुढे मोठे आवाहन आहे. या गोष्टी घरात होत असल्यामुळे कायदा व प्रशासन यात हस्तक्षेप करण्यापेक्षा समाजाने स्वत: सुसंस्कारी होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तसेच यापुढेही चांगल्या कामाची अपेक्षा राज्य महिला आयोगाची आहे, असेही श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदर पाहता श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, जिल्ह्यात 81 सोनोग्राफी सेंटर कार्यरत आहेत. तेथे कोणत्याही प्रकारची गर्भलिंग निदान चाचणी होणार नाही याची तपासणी केली जावी तसेच जर कुठे अशा प्रकारच्या केसेस आढळल्याच तर तात्काळ त्या सेंटरवरती कार्यवाही करुन ते सेंटर सील करण्याचे आदेशही यावेळी श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिले.
बालविवाह रोखण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातल्या आशा वर्कर्स यांनी पुढाकार घेऊन याबाबतची माहिती प्रशासनास कळवावी. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र बळकट करण्यात येईल. या ठिकाणी चांगली खोली, सौचालय, फर्निचर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार. सदृढ आणि चांगला समाज निर्माण होण्यासाठी सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या.