उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत राज्यभरातील किमान 75 नद्यांवर नदी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. चला जाणूया नदीला अभियाना संदर्भात आज दि.21 डिसेंबर 2022 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

 या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अभियानाचे प्रमुख अनिकेत लोहिया, लालासाहेब आगळे, विभागीय वन अधिकारी श्री.पौळ तसेच उपविभागीय अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

  अभियाना संदर्भात बोलताना श्री.लोहिया म्हणाले की, नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथून झालेली असून, 26 जानेवारी 2023 पर्यंत 75 नद्यांवर नदी संवाद यात्रा पूर्ण होणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, त्यांचा प्रचार, प्रसार आणि इतर बाबींसाठी साहाय्य करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. दर महिन्याला या समितीची बैठक होईल. या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या नावीन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर तरतुदीच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून निधी खर्च करता येणार आहे.

 जिल्ह्यात 1 जानेवारीपासून हे अभियान सुरु होणार आहे. जिल्ह्यातील मांजरा नदी संदर्भात हे अभियान राबविले जाणार आहे. मांजरा नदी ही जवळपास महाराष्ट्रातून 750 किमी वाहत जाते. बीड जिल्ह्यातील मांजरा नदीच्या उगमापासून हे अभियान सुरु होणार आहे.‍ दि.03,04,05 आणि 06 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील भूम, वाशी आणि कळंब तालुक्यातील एकूण 30 गावांतून जसा नदीचा प्रवाह तसे हे अभियान त्या प्रवाहा बरोबर जाणार आहे.  

 शाळांशाळांतून नदी प्रणालीवर आधारित विविध स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांमध्ये नदी विषयी जनजागृती करण्याचे काम शिक्षकांनी करावे, विविध उपक्रम राबविण्यात यावेत, गावपातळीवर हे अभियान एलईडी व्हॅन, चित्ररथाद्वारे राबविण्यात येणार असल्याचे श्री.लोहिया यांनी यावेळी सांगितले.

  या अभियानांतर्गत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वन विभाग आदींवर मोठी जबाबदारी असणार आहे. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी ओळखून हे अभियान यशस्वी करावयाचे आहे, असेही यावेळी श्री. लोहिया म्हणाले.

 
Top