नळदुर्ग / प्रतिनिधी-

 पावणे दोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देवाचे आगमन नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात दि.२५ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे झाले. यावेळी श्री खंडोबा देवाचे नळदुर्गकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

 खंडोबा देवाचे मुळ ठिकाण हे नळदुर्ग (मैलारपुर) हे असुन खंडोबा भक्तांसाठी हे अतीशय महत्वाचे व श्रद्धेचे ठिकाण आहे. त्यामुळे देव याठिकाणी आल्यानंतर श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी याठिकाणी खंडोबा भक्त मोठी गर्दी करतात.या खंडोबा देवाचे पावणे दोन महिने वास्तव्य नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात असते तर सव्वा दहा महिने खंडोबा देवाचे वास्तव्य हे अणदुर येथे असते. दोन्ही गावच्या मानकऱ्यांमध्ये लेखी करार होऊन देव आणला आणि नेला जातो.

 दि.२५ नोव्हेंबर रोजी अणदुर येथे श्री खंडोबा देवाची यात्रा झाल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्री खंडोबा देवाचे पालखीतुन वाजत--गाजत मानकरी तसेच शेकडो खंडोबा भक्तांच्या उपस्थितीत नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात आगमन झाले. खंडोबा देव आणण्यासाठी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक बसवराज धरणे शिवसेना शहर प्रमुख संतोष पुदाले यांच्यासह मानकरी व २०० खंडोबा भक्त देव अणदुर येथे गेले होते. रात्री दोन्ही गावच्या मानकऱ्यांमध्ये पारंपरिक लेखी करार झाल्यानंतर श्री खंडोबा देवाचे नळदुर्गकडे आगमन झाले. श्री खंडोबा देवाचे स्वागत करण्यासाठी गोलाई ते खंडोबा मंदिरापर्यंत भक्तांची गर्दी होती. रस्त्यात आकर्षक अशी रंगोळी काढण्यात आली होती. महिला खंडोबा भक्तांची यामध्ये मोठी संख्या होती. मैलारपुर येथील हॉटेल महाराजा पॅलेसचे मालक तानाजी जाधव व महेश जाधव यांनी खंडोबा देवाचे स्वागत करण्याबरोबरच सर्व भक्तांसाठी चहा--पाण्याची व्यवस्था केली होती. सकाळी सहा वाजता मैलारपुर येथील खंडोबा मंदिरात विधिवत पुजा करून श्री खंडोबा देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top