उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कोरोना महामारीमुळे अनेक परिवारांनी आपले आधारस्तंभ गमावले आहेत. त्यानंतर ज्या संघर्षाचा सामना आपण केला आहे त्याचे कौतुक जगभरातून होत आहे. भारताने या महामारीवर उपाय म्हणून लस तयार केली आणि पूर्ण जगाला त्याचा पुरवठा केला. याप्रमाणेच कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांनी आपल्यावर आलेल्या संकटाचे संधीत रुपांतरण करुन जगाला जगण्याचे योग्य उदाहरण दाखवावे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले.                   

 नवी दिल्ली येथून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील महिला व बालविकास विभागाच्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या कार्यक्रमांतर्गत श्री.मोदी बोलत होते. कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निराधार बालकांना दरमाह 4 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.  कोरोना काळात पालक गमावलेल्या निराधार मुलांसाठी (Orphan) मोठी भेट दिली आहे. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ (PM Cares for Children) ही नवी योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांना शिष्यवृत्ती आणि आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.

 पालकांच्या नसन्याने या मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता यावं. यासाठी 18-23 वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि ही मुलं जेव्हा 23 वर्षांची होतील तेव्हा त्यांना 10 लाख रुपये मिळतील. यासोबतच पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिले जाणार आहे. यातून या मुलांना 5 लाखांपर्यंतची उपचारांसाठी मोफत सुविधाही मिळणार आहे.

 या योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही अनाथ बालकांशी संवाद साधला. ‘आज मी तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून बोलत आहे. तुम्हा सर्व मुलांशी बोलताना मला मनोमन आनंद होत आहे. मला याची कल्पना आहे की या कोरोनाने आपल्या सगळ्यांचं मोठं नुकसान केलंय. यात तुम्हा निरागस बालकांच्या पालकांना या कोरोनाने तुमच्यापासून हिरावून घेतलं. ही खूप मोठी हानी आहे. आपल्या पालकांविना आयुष्य जगणं किती कठीण असेल याची मला जाणीव आहे. पण अजिबात खचू नका,  सरकार पुर्णपणे आपल्या पाठिशी आहे. सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे. ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’, ही नवी योजना तुम्हाला आर्थिक पाठबळ देईल. मला कल्पना आहे की, ही रक्कम तुम्हाला आई-वडिलांचं प्रेम देऊ शकणार नाही. पण तुमच्या उदरनिर्वाहासाठी सरकारकडून ही अल्प मदत आम्ही करत आहोत”, असं या मुलांशी बोलताना पंतप्रधान श्री .मोदी म्हणाले. 

 
Top