उस्मानाबाद / प्रतिनिधी-
अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानातून साखर मिळणार असून सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी तीन महिन्याची साखर रास्त भाव दुकानदार यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद तालुक्यात अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांची संख्या 6400 एवढी असून तीन महिन्याच्या वितरणासाठी 192 किंवटल साखर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. साखरेचे प्रत्येकी एक किलोचे पाकिट असणार आहे. माहे जानेवारी ते मार्च या कालावधीतील साखर अंत्योदय लाभार्थ्यांना तिमाहीसाठी साखर नियतन एक किलो पाकीटमध्ये लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 च्या पत्रान्वये सर्व जिल्ह्यांना साखर नियतन मंजूर करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार माहे जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याची साखर लाभार्थ्यांना फेब्रुवारीमध्ये मिळण्याची सुविधा इ-पॉस मशीनवर करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत साखर उपलब्ध नाही त्यांना जानेवारी फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांची साखर मिळण्याची सुविधा ई-पॉस मशिनवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर माहिती रास्त भाव दुकाने व लाभार्थ्यांना कळविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार श्री. माळी व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री. केलुरकर यांनी दिली.