उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‍जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विधी सेवा प्राधिकरण 1987 च्या कलम 12 प्रमाणे मोफत विधी सेवा,सहाय्य व सल्ला देण्यात येतो, यात प्रामुख्याने महिला आणि मुले, अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य,औद्योगिक कामगार,तुरूगातील बंदी,विपत्ती, वांशिक हिंसाचार,जातीय हिसांचार,नैसर्गिक आपत्ती,पूर,दुष्काळ,भूकंप किंवा औद्योगिक आपत्तीना बळी पडलेल्या व्यक्ती, विकलांगता आदींना तसेच नियम 1995 नुसार विकलांग व्यक्ती,मानवी अपव्यापाराचे बळी ,भिक्षेकरी आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न  तीन लाखा रुपयांपेक्षा जास्त नाही.अशा सर्वांना मोफत विधीज्ञ देऊन सहाय्य आणि सल्ला देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करते.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश वसंत यादव यांनी दिली आहे.

  अशा प्रकारच्या   प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधीज्ञ पुरविण्यात आले आहेत आणि यापुढेही पुरवले जातील. अशा विधीज्ञांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

 नवीन दावा दाखल करणे व त्यासाठी टंकलेखनासाठी लागणारा सर्व खर्चाची मर्यादा  1200 रुपयांपर्यंत, न्यायलयात अर्जाचे उत्तर,जमानतीचा अर्ज इत्यादी प्रती अर्जासाठी 400 रुपये आणि जास्तीत जास्त  800 रुपये देण्यात  येतात, पुरावा दाखल करणे व घेणे,उलट तपास घेणे आणि व्युक्तीवादासाठी  700 रुपये  या प्रमाणे खर्च दिला जातो. या व्यतिरिक्त अपरिणामकारक प्रत्येक सुनावणीसाठी  500 रुपये  दिले जातात. परंतु एका प्रकरणामध्ये कमाल मर्यादा 7500 रुपये असते.

   जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधीज्ञ दिल्यानंतर त्या विधीज्ञास कामाच्या स्वरुपाप्रमाणे मानधन आणि मोबदला देण्यात येत असल्यामुळे त्यांना पक्षकार किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पैसे किंवा मोबदला म्हणून काही एक रक्कम देऊ नये.नाही  तर मोफत विधीज्ञ सेवा पुरविण्याचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा संकल्प पुर्णत्वास जाणार नाही. यांची पक्षकारांनी नोंद घ्यावी,असे आवाहन श्री.यादव यांनी केले आहे.

    मोफत विधीज्ञ यांनी त्यांना प्रकरण प्राप्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर त्यांनी परिणामकारक सुनावणी, अपरिणामकारक सुनावणी, दावा दाखल करण्यासाठी संगणक,टंकलेखन,झेरॉक्सचा खर्च याचा तपशील इत्यादी सर्व माहिती संबंधित न्यायालयाकडील प्रमाणपत्रासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या  कार्यालयात  देयकाची मागणी केल्यास नियमप्रमाणे त्यांना योग्य कालावधीत मानधनाची रक्कम मोबदला म्हणून प्रादान करण्यात येते. मोफत विधीज्ञ यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मानधन दिले जाते,यांची माहिती पक्षकारांना असणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती   गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत   पोहोचविण्यासाठी  आमचे प्रमाणिक प्रयत्न आहेत, असेही मत श्री. यादव यांनी व्यक्त केले आहे. यापुढे जिल्हा कारागृहातील बंद्यायासाठीही अशा जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,असेही ते म्हणाले.

   मोफत विधीज्ञ बाबत कोणत्याही पक्षकारांना काही अडचण आल्यास त्यांनी  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण हेल्पलाईन क्र. 15100, राज्य विधी सेवा प्राधिकरण हेल्पलाईन क्र.1800222324 आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दूरध्वनी क्र. (02472) 225424,299117, (8591903625) या हेल्पलाईन,दुरध्वनी,मोबाईलवर कार्यालयीन वेळेत संवाद साधावा,असे आवाहन श्री.यादव यांनी केले आहे.


 
Top