उमरगा  / प्रतिनिधी : -

उमरगातालुक्यात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. मात्र, अवकाळी फटक्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर खताच्या दरवाढीचा बोजा पडला आहे. मागील दोन महिन्यांत तब्बल ३०० ते ४०० रुपये प्रतिबॅग रासायनिक खतांच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. यातून व्यापार, उद्योग सावरत आहेत. तर केवळ कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेले शेतकरी गॅस, इंधन दरवाढीचे चटके सोसणार्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्याऐवजी रासायनिक खतांच्या दरवाढीने नव्या संकटात लोटले आहे. तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सातत्याने समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्रात वाढ झाली आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने  फळबाग लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. डाळिंब, आंबा, द्राक्ष, पपई, संत्रा या फळ बागा  लागवड केली आहे. यातील अनेक बागा मोठ्या प्रमाणावर बहरलेल्या आहेत. मक्का, गहु, हरभरा ज्वारी, भुईमूग, करडई, उन्हाळी सोयाबीन, मूग, उडीद या पिकाची लागवड सुध्दा मोठ्या करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांची रासायनिक खताला मोठी मागणी असून मागील दोन महिन्यांमध्ये १२:३२:१६,२४:२४: ०,१५:१५ :१५, २०:२०:०:१३ या रासायनिक खतांच्या किंमती ३०० ते ४०० रुपये प्रतिबॅग तर ७०० ते ८०० रुपये क्विंटलने वाढल्या आहेत. मात्र, डिएपी व युरिया खताची दरवाढ झाली नाही. तर सुपरफॉस्फेट व दाणेदार या खतांचे दर ४० रुपयांनी कमी झाले आहेत. रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढीमुळे बागायतदार, फळ बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागत असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. कोणत्याही निवडणुकीत शेतकर्याच्या नावाने कळवळा दाखवणारे केंद्र व राज्यातील सत्ताधार्यासह विरोधकही या दरवाढीवर हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन बसले आहेत. शासनाने खतांची केलेली दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.


 
Top