उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आरोपी  भारत उर्फ राजेश दिलीप पवार यास सख्या भावाचा खुन केल्याप्रकरणी मा. एम.आर.नेरलेकर , मा.जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश-१ उस्मानाबाद यांनी जन्मठेप व व १०,०००/-रू.दंड, भा.द.वि. ५०६ या गुन्हयासाठी ५०००/-रू. दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कैद  अशी शिक्षा आज दि.०२.सप्टेंबर २०२१ रोजी सुनावली आहे. विशेष म्हणजे सख्या आईने फिर्याद दिली आहे. 

 अतिरीक्त शासकीय अभियोक्ता श्री. महेंद्र. बी. देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी, आरोपी व मयताची सख्खी आई यांनी पो.स्टे. तामलवाडी जि.उस्मानाबाद येथे दि. ०७. सप्टेंबर २०१९ रोजी फिर्याद दिली की, फिर्यादीचे पती दिलीप पवार हे चार वर्षापूर्वी मयत झालेले आहेत. फिर्यादीस दोन मुले नामे भारत उर्फ राजेश व प्रशांत असे असुन ते तिघेही शेतामध्ये एकत्र राहतात. राजेश हा शेती व्यवसाय करतो व प्रशांत हा चिंचोली एम.आय.डी.सी. सोलापूर येथे केमीकल कंपनीमध्ये नोकरी करतो. प्रशांत यास दि.०५ सप्टेंबर २०१९ रोजी सुट्टी असल्याने तो घरी होता. त्यावेळी राजेश हा प्रशांत यास ‘घरातील सर्व व्यवहार तुच पाहतोस ते माझेकडे दे व मी तुला खल्लासच करतो’ असे म्हणुन त्याचेसोबत नेहमीच भांडण तक्रारी करायचा.

दि.०५. सप्टेंबर २०१९ रोजी महालक्ष्मीचा सण असल्याने फिर्यादी रात्री बराच वेळ जागी होती. त्यावेळी फिर्यादीचे दोन्ही मुले वेगवेगळया खोलीमध्ये झोपले होते. त्यानंतर अंदाजे ०१.०० वा.सु. फिर्यादी ही प्रशांत झोपलेल्या खोलीमध्ये झोपली. दि.०६.सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे अंदाजे ०३.३० वा. सु. फिर्यादी उठली त्यावेळी राजेश हा बाहेर जावुन आला व त्याचे खोलीत झोपला. फिर्यादीही झोपी गेली. त्यानंतर थोडयावेळात फिर्यादीला जाग आली त्यावेळी ती उठली असता राजेश हा फिर्यादीचे खोलीत तिचे पायाजवळ उभा दिसला. म्हणुन फिर्यादीने कारे असे विचारले असता राजेशने त्याचे हातातील कु-हयाडीने प्रशांत याचे डोक्यात, तोंडावर जोर-जोराने दोन वार केले. त्यावेळी फिर्यादीने आरडा-ओरड केला व प्रशांत यास पाहिले असता त्याचे डोक्यात, तोंडावर वार झाल्याचे दिसले व त्यातुन रक्त येत होते, प्रशांत हा पूर्ण रक्तबंबाळ झाला व त्याची कुठलीही हालचाल नव्हती असे फिर्यादीस दिसले. फिर्यादी मदतीसाठी लोकांना आरडा ओरड करून बोलवत असताना राजेश म्हणाला की ‘ओरडु नकोस तो मेला आहे, तु जर ओरडलीस तर तुलाही मारून टाकील’ अशी धमकी दिली. तरीही फिर्यादीने आरडा-ओरड करून लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केली. परंतु कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे फिर्यादी ही स्वतः चालत गावाकडे जावु लागल्यास राजेश हा कोणालातरी फोन लावुन बोलत फिर्यादीचे पाठीमागे आला. फिर्यादीने गावात जावुन गावातील महादेव पाटील यांचे पिकअप बालावले. त्याचेसोबत गावातील भानुदास पाटील, परमेश्वर गायकवाड, सिध्देश्वर गायकवाड, सुनिल गायकवाड असे लोक घरी घेवुन आली व सर्वानी मिळुन जखमी मुलगा प्रशांत यास सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे औषधोपचारकामी दाखल केले.

 फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून पो.स्टे. तामलवाडी जि.उस्मानाबाद येथे आरोपी भारत उर्फ राजेश दिलीप पवार (वय. ३३ वर्षे रा. धोत्री, ता.तुळजापुर,) याच्या विरूदध गु.र. क्रमांक ८७/२०१९, भा.द.वि. कलम ३०२, ५०६ अन्वये गुन्हा नोंद होवुन सदर प्रकरणाचा तपास आर.पी. जगताप, पोलीस उप निरीक्षक, तामलवाडी यांनी केला.

 सदर प्रकारणाची सुनावणी मा. एम.आर.नेरलेकर, मा.जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश-१ उस्मानाबाद यांचे समोर झाली. सदर प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने श्री. महेंद्र बी. देशमुख अति. शासकीय अभियोक्ता यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. अभियोग पक्षातर्फे आलेला पुरावा व महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून मा. एम.आर.नेरलेकर साहेब, मा.जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश–१ उस्मानाबाद यांनी आरोपी भारत उर्फ राजेश दिलीप पवार यास आज दि.०२.०९.२०२१ रोजी भा.द.वि. कलम ३०२, ५०६ या गुन्हयासाठी दोषी ग्राहय धरून त्यास भा.द.वि. कलम ३०२ या गुन्हयासाठी जन्मठेप व १०,०००/-रू.दंडाची शिक्षा व भा.द.वि. ५०६ या गुन्हयासाठी ५०००/-रू. दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कैद अशी शिक्षा अशी शिक्षा   दि.०२.सप्टेंबर २०२१ रोजी सुनावली. अभियोग पक्षाच्या वतीने अति.शासकीय अभियोक्ता श्री.महेंद्र बी. देशमुख यांनी बाजू मांडली.


 
Top