कळंब / प्रतिनिधी-

 दिल्ली येथील सबिया सैफीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी सोमवारी कळंब येथे टिपू सुलतान ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अकिब पटेल यांनी कळंब तहसीलदार रोहन शिंदे यांना हे मागणीचे निवेदन दिले.

 निवेदनात म्हटले आहे की, देशात आज महिला सुरक्षीत नाहीत. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे घोषवाक्य फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात देशात दररोज कुठे न कुठे स्त्रीयांवर अत्याचार होत आहेत. देशाच्या राजधानीत देखील महिला सुरक्षीत नाहीत ही एक शोकांतीकाच, असं देखील निवेदनात म्हटले आहे. सबिया सैफी ही दिल्ली पोलीस दलात डिफेन्सची नोकरी करीत होती. 27 ऑगस्ट 2021 रोजी ती अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी जागोजागी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. पोलीसांना व कलेक्टर साहेबांना मदत मागितली पण मदत मिळाली नाही. नंतर तिचा मृतदेहच मिळाला. तिच्यासोबत चार जणांनी दुष्कर्म केले व चाकूने शरीरावर 50 ठिकाणी जखमी करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली. तिच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा. न्याय न मिळाल्यास ‘टिपू सुलतान’ ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात, असा इशारा देखील देण्यात आला आहे. 

निवेदनावर  टिपू सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अकिब पटेल, बाळासाहेब कथले,प्रमोद करवलकर, संध्या सोनटक्के, हुजेब बागवान, शाहरुख सय्यद, मुजम्मील पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top