तुळजापूर / प्रतिनिधी -
परंडा तालुक्यातील ितर्थक्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ मंदीर परीसरातील माकडांवर उपासमारीची वेळ आली होती या पार्श्वभूमीवर उद्योगपती अरुण पवार यांनी ६०० माकडांना १५ दिवस पुरेल एवढे खाद्य उपलब्ध करून दिल्याने माकडांची होणारी उपासमार आता थांबणार आहे.
पुणेस्थीत ‘मराठवाडा जनविकास संघा’च्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे जनसेवेचे व्रत हाती घेतलेले उद्योगपती जनसेवक अरुण पवार यांनी शेंगदाणे, फुटाणे, काकडी, टोमॅटो, चिक्कु, कलिंगड, पेरु आणि खरबूज असे पाच - सहाशे माकडांना पंधरा - विस दिवस सहज पुरेल इतके खाद्य सोनारीत पोहोच केले. माकडांना खाद्य दिल्यानंतर बोलताना अरुण पवार म्हणाले, की, आपण सर्वांनी कोरोना विषयक नियम पाळुन शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. शेवटी आपल्या लोकांची काळजी घेत, कोरोनास रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अभिषेक पवार , गजेंद्र भोरे, सागर भोरे, श्रीपतपिंपरीचे विद्यमान सरपंच रामराजे ताकभाते, ग्रामपंचायत सदस्य बापु तापकीरे, महादेव चिकणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.