परंडा / प्रतिनिधी : -

महामारीच्या साथीमुळे शहर व तालुक्यातील सर्व व्यवसाय बंद झाले असून बारा बलुतेदार व इतर व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात व्यवसाय बंद आहेत. सरकारने टाळेबंदी लावल्याने आर्थिक व्यवहार पूर्णपणे थंडावले आहेत. सुतार, लोहार, कुंभार,नाभिक आदी बारा बलुतेदार काम नसल्याने मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एकीकडे काम नाही दुसरीकडे रोगाची भीती अशा परिस्थितीत लोकांना आला दिवस काढावा लागत आहे. अनेक व्यावसायिकांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे. ते कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत आहे. सततच्या बंदमुळे अनेक लहान व्यापारी आपला व्यवसाय कायमचा बंद करावा लागणार की काय या काळजीत आहेत. कर्ज फेडता न आल्यास व्यवसाय बंद करावा लागणार असे या व्यापाऱ्यांनी सांगितले. 

शहर व परिसरातील सर्व कारखाने, लाकूडअड्डे अनेक दिवसांपासून बंद आहेत. कामगार, मजुर रोजगार नसल्याने  आर्थिक विवंचनेत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात माठांच्या विक्रीतून कुंभार व्यावसायिकांना रोजगार मिळतो. यावर्षी माठांची विक्री झाली नसल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. 

सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प असल्याने दुकानाचे भाडे ,लाईटबिल आदी कसे द्यायचे या चिंतेत शहर व परिसरातील व्यावसायिक आला  दिवस काढत आहेत. या व्यावसायिकांना शासनाकडून ठोस आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. सरकारने बारा बलुतेदार व सर्व व्यावसायिकांना आर्थिक मदत करून अडचणीतून बाहेर काढावे, अशी मागणी होत आहे.

 
Top