उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाची दमदार कामगिरी

१० वर्षात २ हजार ५७४ जणांना शोधण्यात यश


उस्मानाबाद / प्रतिनिधी -

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील पथकाने हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेत त्यांना त्यांच्या घरी पोहोच करून मदत केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिसांनी हरवलेल्या व विविध कारणांनी घर सोडून गेल्या बालकांना घरी सुरक्षित पोहचवले आहे, विशेष म्हणजे हरवलेले एकही मुलगी किंवा बालक मानवी तस्करीचा शिकार होण्यापूर्वी पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर करीत या बालकांना शोधण्यात आले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात २०१९- २० या वर्षात १६१ बालके हरवल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या त्यापैकी ९६.२७ टक्के प्रकरणात शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उमरगा विभागातून २० टक्के, तुळजापूर २१, उस्मानाबाद शहर २२, कळंब सर्वाधिक २३ तर भूम विभागात १४ टक्के तक्रारी प्राप्त झाल्या. या मिसिंग गुन्ह्याचा अभ्यास करता या केस ह्या कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील असून पिडीताचे कुटुंब प्रमुख हे मजुरी व शेती करीत आहेत. मिसिंग ७७ केसेसमध्ये वय १३ ते १६ असून त्याची टक्केवारी ४८ टक्के आहे उर्वरीत ३६ बालकांचे वय हे १७ ते १८ वर्ष दरम्यान आहे तर १८ वर्षावरील संख्या १३ टक्के आहे. हरवलेल्या बालकांपैकी ७७.६ टक्के महिला असून २२.४ टक्के पुरुष आहेत. एकूण तक्रारीच्या ७१ टक्के पीडित हे पळून गेल्याचे निदर्शनसास आले असून त्यापैकी ३२ टक्के हे लग्न करण्याच्या हेतूने तर २२ टक्के हे कौटुंबिक वाद व तक्रारीतून , १.२५ टक्के जणांनी नौकरीच्या निमित्ताने, २.४८ टक्के जणांनी शैक्षणिक तणावातून घर सोडले आहे. 

२०११ ते २०२१ या १० वर्षाच्या काळात ३ हजार ३६१ मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या यात २ हजार २६३ महिला व १ हजार ३९८ पुरुष होते त्यापैकी ४७७ महिला व २६३ पुरुष स्वतःहून परत आले तर १ हजार ६४१ महिला व ९३३ पुरुष असे २ हजार ५७४ जणांना शोधून त्यांच्या घरी पाठविण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. १४५ महिला व १६९ पुरुषांचा शोध घेणे बाकी आहे. 

पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी त्यांच्या अधिकारी यांच्या वारंवार बैठक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानची व त्याच्या वापराची माहिती दिली त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यात पथक तयार करून त्याची जबादारी देण्यात आली याकामी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शखाली एक टीम तयार करण्यात आली व त्यानंतर अनेक प्रलंबित हरवल्याची प्रकरणे उघडकीस आली. 

 *तपासात पोलिसांचे कसब व यशस्वी प्रयत्न* 

एका एक मुलगा व मुलगी हे पळून गेल्यानंतर एकत्र राहत होते मात्र त्यांनी संसारासाठी लागणारे गॅस सिलेंडर घेण्यासाठी अर्ज केला व त्याचा धागा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांना शोधण्यात यश आले. एक मुलगी घरून गेल्यानंतर तिने तिचा मोबाईल व संपर्काची सर्व साधने बंद केली व ती अधूनमधून इन्स्टाग्राम या ऍपच्या माध्यमातून मिळेल त्यांच्या मोबाईलवरून मित्र मैत्रिणीच्या इन्स्टा ग्रुपवर संपर्क साधत होती त्यामुळे तिचे लोकेशन मिळणे कठीण जात होते मात्र संपूर्ण इन्स्टा ग्रुपवर नजर ठेवून तिला विश्वासात घेऊन तिला शोधण्यात पोलिसांना यश मिळाले तर एका प्रकरणात एक आई मुलासह जंगलात राहत होती व मुलाला आत कोंडून खोलीला बाहेरून कुलूप लावत होती आणि धाब्यावर काम करीत होती मात्र तिला शोधून तिच्या मुलाला सुखरूप घरी पोहचविले.

 
Top