उच्चस्तरीय चौकशी करून दोषीं विरूध्द कडक कारवाई करा


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा केंद्र शासनाने देशातल्या अविकसीत मागास जिल्हयांच्या यादीत समाविष्ट केलेला असल्यामुळे जिल्हयाच्या सर्वसामान्य नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जिल्हयाचा दरडोई उत्पन्न निर्देशांक उंचावण्यासाठी आलेल्या कोटयावधी रूपयांच्या निधीतून सत्ताधारी शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांनी टक्केवारी घेवून स्वत:चे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले उद्योग हे मागास जिल्यातील जनतेच्या मताचा अपमान आहे. कारण उस्मानाबाद या मागास जिल्हयाचा विकास करतील म्हणून या जिल्हयातील जनतेने शिवसेनेचे खासदार व तीन आमदार निवडून दिले आणि तेच विकास निधीवर डल्ला मारून स्वत:चे कल्याण करत असतील तर जिल्हयातील मतदारांनी विकासाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा सवाल ही भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उपस्थितीत करून  जिल्हाधिकाऱ्यांना मांगण्याचे निवेदन दिले. 

 मागील वर्षभर कोरोना या आजारामुळे संपूर्ण जिल्हा त्रस्त असताना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी मात्र टक्केवारी वसुलीत गुंतल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे नागरीक वैद्यकीय सुविधा, औषधोपचार, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर यासाठी जीवाचा आटापीटा करत असताना त्यांची सोय करण्याऐवजी पालकमंत्र्यांसहीत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी टक्केवारीत गुंग राहून नागरीकांना वा-यावर सोडून स्वत:चे कल्याण करताना पाहणा-या सामान्य मतदारांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना यासाठीच निवडून दिले होते का? असा प्रश्न पडला आहे. 

 सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आरोग्य, शेती, शिक्षण, समाजकल्याण, महिला बालकल्याण यासह संपूर्ण जिलहयाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन आराखडयाच्या माध्यमातून कोटयावधी रूपये खर्चुन सोयीसुविधा उभारण्याऐवजी त्यात टक्केवारी घेवून निकृष्ट कामे करण्यास प्रोत्साहन देणा-या या लोकप्रतिनिधींचा भाजपा जाहीर निषेध करत आहे

हि टक्केवारीची कृती राज्यातल्या उध्दव ठाकरे सरकारची देणगी असून त्यांच्याच आशिर्वादाने सुरू आहे कि काय अशी शंका आता जिल्हयातील मतदारांना वाटत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील टक्केवारी सह पोलिस, आणि इतर खात्यातील ही टक्केवारी गोळा करणा-या सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्री आणि खासदार, आमदारांच्या कार्य पध्दतीमुळे जिल्हयातील जनतेच्या मनात भ्रष्टाचारी शिवसेना लोक प्रतिनिधी बददल असंतोष, राग, संताप निर्माण होत असून याचे उत्तर संबंधितांनी जिल्हयातील मतदार जनतेला द्यावे , अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयामधील डि.पी.सी. निधीसाठी टोल वसुली व पोलिस अधिका-यांकडे हप्त्याची मागणी अनुषंगाने उच्चस्तरीय चौकशी करून   दोषीं विरूध्द कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.

निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. नितीन भोसले, दत्ता कुलकर्णी, नेताजी पाटील, राजसिंहराजे निंबाळकर  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top