उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनाच्या दुसरया लाटेचा सर्वाधिक तडाखा राज्यातील पत्रकारांना बसला असून एकट्या एप़िल महिन्यात राज्यातील तब्बल 49 पत्रकारांचे  कोरोनानं बळी घेतले आहेत. ऑगस्ट 2020 पासून आजपर्यंत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांची संख्या आता 121 वर पोहोचली आहे असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.सरकार पत्रकारांना उपचार करण्यासाठी व मयत पत्रकार यांच्या वारसांना आर्थिक मदत करीत नसल्याने 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील पत्रकार एक दिवशीय आत्मक्लेष आंदोलन व अन्न त्याग आंदोलन करणार आहेत. याला जिल्ह्यातील पत्रकार यांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व पदाधिकारी यांनी केले आहे.

कोरोनानं राज्यात हाहाकार माजवला आहे.पत्रकार हे फिल्डवर उतरून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करीत आहेत. ऑक्सिजन आणि व्हेटिलेटरचा तुटवडा, ढेपाळलेली सरकारी यंत्रणा आणि पक्षीय राजकारणाचा फटका कोरोना रूग्णांना बसतो आहे. कोरोना रूग्णांची किती ससेहोलपट सुरू आहे आणि कशी लूट केली जात आहे याचा पुरावा म्हणून सोलापुरच्या पत्रकाराची व्हायरल क्लीप बघता येईल. व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने पत्रकारांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे. मार्च महिन्यात 18 पत्रकारांचे मृत्यू झाले होते मात्र एप्रिलमध्ये हा आकडा तिपप्टीने वाढून 49 वर पोहोचला आहे त्यामुळे मार्च आणि एप़िलमधील मृत पत्रकारांची संख्या 67 वर पोहोचली आहे.

एप्रिलमध्ये सरासरी दोन दिवसाला तीन पत्रकार मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील कोरोना बाधित पत्रकारांची संख्या 5000 पेक्षा जास्त असून किमान 200 पत्रकार राज्यातील विविध रूग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. होम क्वारनटाईन असलेल्या पत्रकारांची संख्या देखील मोठी आहे. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे.. उपचाराची कोणतीही काळजी घेतली जात नाही, दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात नाही.

मध्यप्रदेश सरकारने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांच्या खात्यावर पाच लाख रूपयांची रक्कम जमा करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे माध्यमातील सर्वजण हतबल झाले असल्याने एस.एम.देशमुख यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी आत्मक्लेष आंदोलन व एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातील पत्रकार संघ, पत्रकार देखील आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.

सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कोणालाही बाहेर पडता येणार नाही. घरात बसूनच सारे पत्रकार दिवसभर अन्नत्याग करतील.एस.एम.देशमुख बीड जिल्हयातील देवडी या गावी माणिकबाग या आपल्या निवासस्थानी आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाला जिल्ह्यातील पत्रकार यांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सचिव संतोष जाधव, कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, सहसचिव राजाभाऊ वैद्य व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.

 
Top