उस्मानाबाद / प्रतिनिधी:

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर युनीट स्थापण्यास अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दुध उत्पादक संघ,संस्था,शेतकरी उत्पादक कंपनी,संस्था स्वयंसहाय्यता बचत गट आणि गोशाळा,पांजरापोळ,गोरक्षण संस्था या लाभार्थी संस्थांना द्यावयाचा आहे.योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल जिल्हयातील एकाच संस्थेला या योजनेचा लाभ द्यावयाचा आहे.त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त यांनी केले आहे.

या योजनेत प्रतियुनीट 20.0लक्ष रुपये एवढया खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रुपये केंद्रशासनाचे अर्थसहाय्य आहे तर उर्वरीत 50 टक्के 10 च्या लक्ष रुपये एवढी रक्कम लाभार्थी संस्थेने स्वतः खर्च करावयाची आहे. योजनेचा लाभ द्यावयाच्या संस्थेची 10 लक्ष रुपये खर्च करण्याची क्षमता असल्याबाबतची खात्री करण्यासाठी मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल संबधित संस्थेनी सादर करावयाचे आहे.संस्थेच्या स्वहिस्सा निधीसाठी संस्थेच्या स्वनिधीमधून खर्च करू शकेल अथवा आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेवू शकेल. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संबधित संस्थेची असेल.    

      मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनीटमध्ये सायलेज बेलर,हेवी डयुटी कडबा कुटटी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली, वजन काटा, हार्वेस्टर, मशीन शेड. यापैकी सायलेज बेलर व हेवी डयुटी कडबा कुटटी यंत्र या मशिनरीची संस्थेने खरेदी करणे आवश्यक आहे. हे खर्च वजा जाता 20.0लक्ष रुपये मधील उर्वरीत निधीमधून संस्थेच्या आश्यकतेनुसार इतर बाबींसाठी खर्च करता येईल. या निधीमधून खरेदी केलेल्या मशिनरीची संस्थेस शासनाच्या संमती शिवाय परस्पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्थेस 500 रुपयांच्या मुद्रांकावर रितसर करारनामा करून ध्यावा लागेल. तसेच पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी भेटीस आल्यानंतर संबधित अधिका-यांना या मशिनरी दाखवणे बंधनकारक असेल.संस्थेनी आवश्यक मशिनरीची खरेदी केल्यानंतर संस्थेच्या बँक खात्यामध्ये हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डीबीटी (DBT)द्वारे जमा करण्यात येईल. योजनेचा उद्धेश मुरघास निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी असल्याने संस्था मशिनरीच्या सहाय्याने मुरघास तयार करून केलेल्या विक्रीमधून माफक नफा मिळवू शकेल. तथापि, मुरघास तयार करण्यासाठी हिरव्य चा-याचे उत्पादन अथवा खरेदी,मजुरी खर्च,इंधन खर्च आणि इतर अनुषंगीक खर्च,मशिनरी दुरुस्ती आदी बाबीवरील होणारा खर्च हा संस्थेने स्वत:करावयाचा आहे.

इच्छुक लाभार्थींनी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे दि.20 मार्च-2021 पर्यंतच्या कालावधीत सादर करावा.अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे,अटी व शर्ती याबाबतचा तपशील लाभार्थींशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि संबंधित तालुक्याचे पशुध विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहे.

         अधिकच्या माहितीसाठी संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा,या योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गातील उपरोक्त लाभार्थीं संस्थानी लाभ घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  यांनी केले आहे.


 
Top