उस्मानाबाद/ प्रतिनिधी

वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीआजार यादीमध्ये कोव्हीड-१९ चा समावेश करण्याची मागणी एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हीड-१९ मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षकांनी क्वारंटाईन सेंटर्स, रेशन दुकाने, चेक पोस्ट, विविध सर्वेक्षणे, कोरोना केंद्र, इ. प्रकारच्या आपत्कालीन सेवा आनंदाने व यशस्वीपणे बजावल्या आहेत. सध्या देखिल अनेक जिल्ह्यांत या सेवा चालू आहेत. सर्व आपत्कालीन सेवा बजावत असताना   शिक्षकांनी शिक्षण थांबू नये म्हणून आपापल्या परीने ऑनलाईन शिक्षण चालू ठेवले आहे. सदर सेवा बजावत असताना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च झाले. परंतु वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती आजार यादीमध्ये कोव्हीड १९ चा समावेश नसल्याने शिक्षकांसमोर अचानकपणे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.  त्यामुळे वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीआजार यादीमध्ये कोव्हीड-१९ चा समावेश करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर जिल्हाध्यक्ष  विश्वास शिंदे, पवन सूर्यवंशी यांच्या स्वाक्ष्ऱ्या आहेत. 


 
Top