उस्मानाबाद/ प्रतिनिधी
खरीप हंगाम 2020 चे जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचे  क्षेत्र 2 लाख 46 हजार 2.58 हेक्टर  इतके आहे. 1 लाख 66 हजार 191.50 हेक्टर क्षेत्रावर दि.29 जून, 2020 अखेर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये पाऊस आवश्यक प्रमाणात पडला नसल्याने सोयाबीन बियाणे उगवण झाली नसल्याच्या तक्रारी अधिक
प्रमाणात प्राप्त झाल्याने अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी  दुबार पेरणी करण्यापूर्वी कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविलेल्या आहेत.ज्या क्षेत्रावर सोयाबीन बियाण्याची 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगवण टक्केवारी आलेली आहे. अशा ठिकाणी दुबार पेरणी करु नये.ज्या ठिकाणी दुबार पेरणी करावयाची आहे. अशा ठिकाणी खात्रीलायक सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन, उगवणशक्ती तपासून व बीज पक्रिया करुन  पुरेशा  ओलाव्यावर पेरणी करावी.
दुबार पेरणीसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होत नसले तर तूर पिक हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. कारण अजूनही तूर पिकाचा पेरणीचा कालावधी संपलेला नसून तुरीच्या बियाण्याची उपल्ब्धता, त्याची उगवण क्षमता चांगली असून तुलनेत हे स्वस्त बियाणे आहे.कपाशी उत्पादक क्षेत्रामध्ये दुबार पेरणीसाठी कपाशी हे सुध्दा पर्यायी पिक होऊ शकते.दुबार पेरणी करताना तणनाशक फवारलेल्या क्षेत्रात ज्वारी किंवा मक्याची पेरणी न करता सोयाबीनचीच पेरणी करावी. कारण त्या तणनाशकांचा अंश 80 ते 90 दिवासांपर्यंत शेतात राहतो.
या महत्वाच्या तांत्रिक बाबींची माहिती सर्व विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना द्यावी. जेणेकरुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळेल, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आहे आहे.
 
Top