उस्मानाबाद /प्रतिनिधी
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना “अर्सेनिक अल्बम-३०” हे होमिओपॅथी औषध तातडीने उपलब्ध होण्यासाठी राज्य पातळीवर खरेदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात बदल करून ते ग्रामपंचायत स्तरावर खरेदी करण्याचे अधिकार देण्यात यावेत अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात नागरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व त्यांची प्रतिकारशक्ती वाढीसाठी  “अर्सेनिक अल्बम-३०” हे होमिओपॅथी औषध मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे तो अतिशय स्तुत्य असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. ग्रामविकास खात्याकडून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना दि.२८ मे रोजी एक पत्र काढण्यात आले असून त्यात १३ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त अखर्चित निधी व १४ व्या वित्त आयोगा मार्फत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम राज्य प्रकल्प संचालक,राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.सदर पत्र मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक सरपंचांनी आ.पाटील यांच्याशी संपर्क साधत यात सुधारणा करून ग्रामपंचयात स्तरावर त्याची खरेदी करण्याबाबत निर्णय व्हावा अशी विनंती केली होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दि.३१ मार्च २०२० च्या परिपत्रकानुसार सर्व ग्रामपंचायतींना १३ व्या वित्त आयोगातील अखर्चित व १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी फवारणी साठी औषध खरेदी,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे,गोरगरिबांसाठी मास्क व सॅनिटायझर खरेदी,ग्रामपंचयात कर्मचारी, आशा वर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती,परिचर यांना १००० प्रोत्साहन भत्ता देने आदी साठी निधी वापरण्याबाबत आदेश देण्यात आले होते. वरील सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर अधिकार देत त्याचे विकेंद्रीकरण केल्याने त्यांची तात्काळ पूर्तता झाली असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
 “अर्सेनिक अल्बम-३०” या होमिओपॅथी औषधीच्या खरेदीबाबत मात्र दि.३१ मार्चच्या निर्णयाच्या अगदी परस्परविरोधी निर्णय घेण्यात आल्याने सरपंचांनी अंमलबजावणीत अनके अडचणी येण्याची भीती व्यक्त केली असून मास्क व सॅनिटायझर खरेदी ज्या पद्धतीने त्यांच्या पातळीवर झाली त्याच पद्धतीने अर्सेनिक अल्बम-३०” या औषधी ची खरेदी देखील राज्य पातळीवर न करता ग्रामपंचायत स्तरावर खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.
आ.पाटील यांनी दि.१६ मे रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील कोरोनाच्या लढ्यात समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड निधीतून “अर्सेनिक अल्बम-३०” औषध खरेदी करण्याबाबत पत्र लिहून मागणी केली होती.त्याला अनुसरून जिल्हाधिकारी यांनी विविध माध्यमातून सदर औषध उपलब्ध केले आहे.अनेक सामजिक संघटना,राजकीय पक्ष व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात “अर्सेनिक अल्बम-३०” औषधीचे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे गावपातळीवर नेमकं कोणाला सदर औषधी प्राप्त झाली व कोणाला नाही याची अचूक माहिती ग्रामपंचायतींकडे असणार आहे.
शासनाने “अर्सेनिक अल्बम-३०” औषधीची राज्य पातळीवर खरेदी केली तर नेमकं गावपातळीवर विविध माध्यमातून किती लोकांना आधीच हे पुरवण्यात आले आहे याची  माहिती शासनाकडे उपलब्ध असणार नाही व सदर माहिती गोळा करण्यास वेळ लागणार आहे.तसेच केंद्रीकृत खरेदी केल्यावर ती ग्रामपंचायतींना पोहचवणे हे देखील वेळखाऊ बाब असणार आहे.उलट प्रत्येक जिल्ह्यात अनेक होमिओपॅथी डॉक्टर असल्याने  ग्रामपंचायत स्तरावर खरेदी झाली तर ती अधिक गतीने होईल व जेवढ्या लोकसंख्येला आवश्यक आहे तेव्हढ्यासाठीच खरेदी करणे सोपे होईल असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
आ.पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना अर्सेनिक अल्बम-३०” औषध खरेदीचे अधिकतम दर शासनाने निश्चित करून .प्रत्येक जिल्ह्यात होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्या सल्ल्याने चांगल्या गुणवत्तेचे औषध खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून नोडल अधिकारी नेमणूक करावी व राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना “अर्सेनिक अल्बम-३०” हे होमिओपॅथी  औषध त्वरित उपलब्द व्हावे यासाठी राज्य पातळीवर खरेदी करण्याच्या निर्णयात बदल करून ग्रामपंचायत स्तरावर खरेदी करण्याचे अधिकार देण्याची मागणी केली आहे.
 
Top