उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रसार होत आहे.यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय धार्मिक,क्रीडाविषयक कार्यक्रम रद्य करण्याच्या सूचना दि.14 मार्च, 2020 च्या अधिसूचनेद्वारे देण्यात आलेल्या आहेत.तसेच मा.मुख्यमंत्री महोदयांनीहीयाबाबत वारंवार निर्देश दिलेले आहेत.
लवकरच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे.या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे.त्यामुळे मुस्लीम समाजातील  नमाज तरावीह व इफतारासाठी एकत्र येतात.सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या, मस्जीदमध्ये सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा  न करणे हितावह ठरणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री,नवी दिल्ली यांनी दि.16 एप्रिल 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व मुस्लीम धर्मीय लोकांना खालीलप्रमाणे सूचना देणेबाबत कळविले आहे.   
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे.कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण,तरावीह तसेच इफतारासाठी एकत्र येऊ नये.घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफतार करण्यात येऊ नये.मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण,इफतार करण्यात येऊ नये.कोणताही सामाजिक,धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण,तरावीह व इफतार इत्यादी धार्मिक कार्य पार  पाडावेत.लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
उपरोक्त सूचनांचे पालन करण्यासाठी मुस्लीम समाजातील धर्मगुरू,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यामातून जनजागृती करावी, असे अपर मुख्य सचिव,अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई यांनी कळविले आहे.
 
Top