उमरगा/प्रतिनिधी--
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ सर्वेक्षण 2020 अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे स्वच्छता अॅपद्वारे नागरिकांच्या स्वच्छता विषयक ऑनलाइन तक्रारी निवारण 24 तासाच्या आत करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासाठी सर्वच नगरपालिकाना नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लक्ष्य देण्यात आले होते. पण नगरपालिका स्तरावर स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली पण या अँपद्वारे तक्रारी करण्याचे प्रमाण नगण्य असून पालिका प्रशासनाकडून या योजनेत अॅप डाऊनलोड हे लक्ष साधल्याचे दाखवून सरकारच्या या अभियानाचा कागदोपत्री यश प्रतिबिंबित होत असला तरी प्रत्यक्षात करोडो रुपये खर्चूनही स्वच्छता अभियानाचा पुरता बोजवारा उडालेला आहे.
घरबसल्या आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबतची तक्रार अँपद्वारे करायची व पालिकेने या तक्रारींचे निवारण 24 तासाच्या आत करायचे अशा पद्धतीने स्वच्छ भारत अभियानाला ग्लोबल स्वरूप देण्याचा प्रयत्न स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्य शासनाने सुरू केला आहे. प्रत्येक नगरपालिकेला लोकसंख्येच्या 3 टक्क्यांपर्यंत नागरिकांनी स्वच्छता अॅप, स्वच्छ मोहल्ला अॅप आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेण्यासाठी व त्याद्वारे तक्रारी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुचित केले आहे. त्यासाठी उद्देश ही देण्यात आले असून त्यावरून गुण देण्यात येणार आहेत. चांगले गुण घेणाऱ्या पालिकेला रोख रकमेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरून संबंधित विभागाकडून मोठा पाठपुरावा केला जातो आहे. स्वच्छता अभियानातंर्गत सरकार करोडो खर्च करीत असताना या अभियानातला फोलपणा ही लक्षात येत आहे.
सध्या उस्मानाबाद जिल्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत काम चालू आहे. उमरगा पालिकेने शहरातील 2 हजार 462 नागरिकांना हे अॅप डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न करून यश मिळविले आहे. पण त्यापैकी फक्त 32 जण या अॅपचा वापर करीत असून त्यांनी आतापर्यंत 217 तक्रारी केल्या आहेत. यात एकाच व्यक्तीने एकच तक्रार पुन्हा पुन्हा केल्याचेही दिसुन येत आहे. एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा तक्रारी कसे काय करू शकतो हा मोठा प्रश्न आहे.

 
Top