उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात शेतकरी मदत केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा न्यायालयासमोरील शिवसेना पक्ष कार्यालयात या केंद्राचा शुभारंभ खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाला. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. उस्मानाबादसह तुळजापूर येथील जुन्या एसबीआय जवळ तसेच उमरगा, कळंब अशा जिल्ह्यातील विविध ठिकाणी या शेतकरी मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, पालिका गटनेते सोमनाथ गुरव, राजनारायण कोळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतक-यांनी त्यांच्या अडचणीसंदर्भात, शासकीय मदतीसाठी तसेच इतर कामांकरिता कार्यालयात अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले. अपसिंगा परिसरात द्राक्ष बागेची पाहणी तत्पूर्वी खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची तसेच पिकांची अपसिंगा व परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांना धीर देत शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

 
Top