कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील जवळपास 97 गावांचा प्रशासकीय कारभार ज्या कार्यालयातून चालतो, त्या तालुक्याच्या ‘मिनी मंत्रालयातच' सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दुष्काळ पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीतील तब्बल 17 ते 18 शासकीय विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी साधे पाणीही उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांची दालने आलिशान आणि नागरिकांच्या वाट्याला मात्र पाण्याविना प्रतीक्षा अन् शौचालयांना कुलूप, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सर्व कार्यालयातून लाखो रूपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जात आहे.
या प्रशासकीय इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, कृषी विभाग, भूमी अभिलेख कार्यालय यांसह विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. जमिनीच्या नोंदी, मोजणी, शेतीविषयक कामे, महसुली प्रकरणे अशा विविध कामांसाठी दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि महिला येथे येतात. मात्र, तासन्तास कार्यालयात थांबणाऱ्या या नागरिकांना पिण्यासाठी एक घोट पाणी मिळण्याचीही सोय नसल्याचे चित्र आहे.
साहेबांच्या दालनात सर्व सुविधा; नागरिकांसाठी साधे पाणीही नाही!
अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पंखे, पडदे, आलिशान बैठक व्यवस्था आणि इतर सुविधा दिसतात. मात्र, ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या कामातून या यंत्रणेचा कारभार चालतो, त्यांच्यासाठी बसण्यास साधी खुर्चीही उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी व्यवस्था उभारण्यात आल्याचे दिसते; मात्र प्रत्यक्षात या व्यवस्था केवळ नावापुरत्याच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कळंब आणि वाशी या दोन विभागांचा कारभार सांभाळणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी साधा नळही उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे.
पुढील आठवड्यात शुद्ध पाण्याची व्यवस्था करणार!
“पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेला जिल्हाधिकारी यांंनी मंजुरी दिलेली आहे. पुढील आठवड्यात त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल.“
-हेमंत ढोकळे, तहसीलदार, कळंब.