(मुुरुम प्रतिनिधी)- रोटरी क्लब मुुरुम सिटीच्या वतीने आयोजित मंगळवारी (ता. 10) रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात प्रा. डॉ. महेश मोटे व त्र्यंबक व्हटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपावली पाडव्याच्या निमित्ताने ‘दीपसंध्या' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभंग, भक्तीगीत आणि भावगीतांच्या सुरेल मैफिलीने सजलेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी गायक सौरभ नाईक, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय केंद्र प्रमुख राजुभाई भालकाटे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. डॉ. महेश मोटे, मीरा मोटे, त्र्यंबक व्हटकर आदींनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या सुमधुर संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक सौरभ नाईक यांनी आपल्या सुरेल स्वरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, अबीर गुलाल उधळीत रंग, भाग्यदा लक्ष्मी बारमा, माझे माहेर पंढरी, मर्म बांधातली ठेव ही, प्रथम तुज पाहता, घेई छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा, बाजे मुरलिया बाजे, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही, अगा वैकुंठीचा राया आदि गीतांवर त्यांना संगत देण्यासाठी नामवंत कलाकार उपस्थित होते. यावेळी तबला वादक प्रशांत गाजरे (नांदेड), हारमोनियम वादक विनायक चौधरी (भालकी), पखवाज वादक विश्वेश्वर जोशी (नांदेड) यांनी आपल्या उत्कृष्ट वादनकौशल्याने मैफिलीत रंग भरले. तसेच, श्रीकर लालवंडीकर (नांदेड) यांनी टाळ वंद्याद्वारे साथ दिली. याप्रसंगी सुनील राठोड, मनश्री मोटे, अनुष्का कबाडे आदींनीही आपल्या गीतातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ब्रह्मकुमार राजूभाई भालकाटे यांनी उपस्थित श्रोत्यांना ओमशांती केंद्राची भूमिका मनोगतातून व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्ताने डॉ. महेश मोटे यांनी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयास वैचारिक अकरा ग्रंथ वाचनालयाचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, मल्लिकार्जुन बदोले, कल्लाप्पा पाटील, डॉ. राजकुमार हिरेमठ, राजकुमार वाकडे, अँड. उदय वैद्य, प्रा. राजकुमार नाईक, रतन पाटील, दिलीप हंगरगे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार सुनील राठोड यांनी मानले. संगीतमय वातावरणात पार पडलेल्या या ‘दीपसंध्या' कार्यक्रमामुळे मुुरुम शहरातील रसिकांची दिवाळी गोड आणि स्मरणीय ठरली.
