येरमाळा (प्रतिनिधी)- शक्ती,भक्ती आणि स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या रविवार (ता. १८)सातव्या माळेला महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतील नऊ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सात वाजता येरमाळा येथील श्री.येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.देवीच्या भक्तीबरोबरच कर्तृत्व,नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविणारा हा प्रसंग ठरला.
भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अश्विन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्रात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. दुर्गा,लक्ष्मी आणि सरस्वती या शक्ती,समृद्धी व ज्ञानाच्या प्रतीक मानल्या जातात.नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या नऊ रूपांचे पूजन करून वाईट प्रवृत्तींवर चांगल्या शक्तीचा विजय आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा संदेश दिला जातो.
नवरात्र म्हणजे केवळ धार्मिक विधी, उपवास आणि घटस्थापनेचा उत्सव नव्हे,तर स्त्रीच्या सामर्थ्याचा,स्वाभिमानाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा सांस्कृतिक जागरही आहे.घरापासून समाजापर्यंत आणि प्रशासनापासून नेतृत्वापर्यंत महिलांनी विविध क्षेत्रांत उमटविलेला ठसा हा या स्त्रीशक्तीचाच आधुनिक आविष्कार मानला जातो.
‘नऊदुर्गां’च्या उपस्थितीने स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला उजाळा
महाराष्ट्रातील नऊ वेगवेगळ्या जिल्ह्यांत प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या नऊ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रीच्या सातव्या माळेला श्री.येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले.नवरात्रातील नऊ दिवस आणि देवीची नऊ रूपे यांचा सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेता,या जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ नऊ महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला, नवदुर्गां देवीचरणी नतमस्तक झाल्याने श्री.येडेश्वरी देवस्थानाची प्रतीकात्मक ओळख निर्माण झाली आहे.
प्रशासनात निर्णयक्षमता,लोकसेवा, संवेदनशीलता आणि नेतृत्व या गुणांच्या बळावर जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला अधिकारी आजच्या स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहेत.त्यामुळे त्यांच्या देवीदर्शनाच्या प्रसंगाला धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले.
श्री.येडेश्वरीच्या दर्शनाला परंपरेचा वारसा.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वसलेले येरमाळा हे श्री.येडेश्वरी देवीच्या श्रद्धास्थानामुळे परिचित आहे.परिसरातील भाविकांसाठी देवी येडेश्वरी श्रद्धा,भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.धार्मिक विधी,देवीची आराधना आणि सामूहिक भक्तिभावातून या उत्सवाला लोकपरंपरेचे स्वरूप प्राप्त होते.
नवरात्रीच्या सातव्या माळेला झालेल्या या नऊ महिला उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देवीदर्शनामुळे येरमाळ्याच्या धार्मिक परंपरेला स्त्रीशक्तीच्या आधुनिक कर्तृत्वाची जोड मिळाली. श्रद्धा आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम घडविणारा ठरवा असा हा प्रसंग नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक आशयाला अधोरेखित करणारा ठरला.
पंधरा जनींचे नियोजन पण नऊ जनींना येडेश्वरी नवरात्री दर्शनाचा योग.
जिल्हा प्रशासनात कर्तव्यावर उपजिल्हाधिकारी जबाबदारी पार पाडत असताना एकमेकींचा संपर्क आलेल्या राज्यातील १५ महिला उप जिल्हाधिकारी यांनी येरमाळ्याच्या श्री.येडेश्वरी दर्शनाला रविवार सुट्टीच्या दिवशीचे नियोजन केले होते.मात्र सध्या दुष्काळी,टंचाई स्थिती असल्याने प्रशासकीय जबाबदारी सांभाळत कोणाला जमले कोणाला नाही पण नऊ जनींचा मिळुन साऱ्याजनी योग जुळून आला.धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील त्यांच्या सोबत होत्या इतर महिला अधिकाऱ्यांची नावे मिळू शकली नाहीत.देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्री दर्शनासाठी आलेल्या नवदुर्गा महिला उपजिल्हाधिकारी यांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
