कळंब (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालय, कळंब येथील महिला विधिज्ञ मंडळाच्या वतीने 'नारीशक्ती' या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महिला न्यायाधीश ए. डी. जाधव उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिला वकिलांना कायद्याचे ज्ञान, न्यायदानातील भूमिका आणि कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या याविषयी अतिशय मोलाचे व सुंदर मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वासाने आणि निष्ठेने कार्य करावे, असा संदेश त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला. कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शकुंतला फाटक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “वकिली हे आव्हानात्मक क्षेत्र असून यात काम करताना महिलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अतिशय निडरपणे, धैर्याने आणि तत्त्वनिष्ठ राहून कार्य करणे गरजेचे आहे.“ त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित सर्व महिला वकिलांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. यात विधिज्ञ मंडळाच्या महिला उपाध्यक्ष ॲड. किरण गालफाडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महिला विधिज्ञ मंडळाच्या उपक्रमांविषयी सविस्तर प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲड. अंजली कुपकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ॲड. लक्ष्मी ओव्हाळ यांनी मानले.
