भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील सर्व्हे नं. 221 मधील शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे 200 कुटुंबांच्या रहिवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पात्र अतिक्रमणधारकांचे तातडीने स्थळ सर्वेक्षण करून नोंदी घ्याव्यात व नियमितीकरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करावी, अन्यथा दि. 2 नोव्हेंबर 2026 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक चंद्रमणी गो. गायकवाड यांनी दिला आहे.

याबाबत गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी, भूम यांना निवेदन दिले आहे. सर्व्हे नं. 221 मधील शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून सुमारे 200 कुटुंबे घरे बांधून वास्तव्यास आहेत. या कुटुंबांच्या निवाऱ्याशी संबंधित नियमितीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रश्नासाठी दि. 30 जून 2026 रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगर परिषद भूम यांना तसेच दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप संबंधित नागरिकांच्या नोंदी घेण्याची व नियमितीकरणाची प्रक्रिया अपेक्षित गतीने सुरू झालेली नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

“दोन वेळा लेखी निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित आहे. आता केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कार्यवाही हवी,” अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली आहे. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन सन 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवासी अतिक्रमणधारकांचे स्थळ सर्वेक्षण करावे, त्यांच्या नोंदी घ्याव्यात, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू करावी आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा लेखी कळवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास दि. 2 नोव्हेंबरपासून नागरिकांच्या हक्कासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी दिला आहे.

 
Top