धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथील समाज मंदिरात विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महिला, पुरुष, युवक-युवती आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि शांततेच्या संदेशासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी सामुदायिकरीत्या त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले. सामूहिक धम्मवंदनेमुळे समाज मंदिर परिसरात बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि वैचारिक महत्त्व विशद केले.  यावेळी गौतम आंबेवाडीकर यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महत्त्वाविषयी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला संतोष राऊत, दादा राऊत, अविनाश राऊत, हनुमंत कांबळे, नामदेव कांबळे, दामोदर राऊत, राहुल राऊत, मेंसू राऊत, मारुती राऊत, प्रज्ञा राऊत, कोमल राऊत, विमल कांबळे, छाया कांबळे, महानंद कांबळे यांच्यासह आंबेवाडीतील महिला, पुरुष, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top