वाशी (प्रतिनिधी)- महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व परस्पर सहमतीने निकाली काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वाशी तहसील कार्यालयात बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीत प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित पक्षकारांनी दि. 13 ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक प्रकरणे अनेक कारणांमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. त्यामुळे संबंधित पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. काही प्रकरणांमध्ये निकालानंतरही एखादा पक्षकार असमाधानी राहिल्यास तो वरिष्ठ न्यायालयात दाद मागतो. परिणामी, महसुली वाद अनेक वर्षे सुरू राहतात. ही बाब लक्षात घेऊन परस्पर सामंजस्यातून व दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होणार असून, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
वाशी तहसील कार्यालयात दाखल असलेली शेतरस्त्यांसंदर्भातील प्रकरणे तसेच कुळाचे प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातील दावे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी विचारात घेतले जाणार आहेत. संबंधित अर्जदार व गैरअर्जदार पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपापसातील वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा. लोक अदालतीत सहभागी होऊन प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी विहित नमुन्यातील अर्ज मंगळवार, दि. 13 ऑक्टोबर 2026 पर्यंत तहसील कार्यालय, वाशी येथे सादर करणे आवश्यक आहे. बुधवारी, दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या महसूल लोक अदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग नोंदवून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय, वाशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.