तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाचा तब्बल 45 दिवसांचा खंड पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कोरड्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकासमोर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांनी दिली. 

कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, ऊस व मका आदी पिके पावसाअभावी उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले. आंदोलनात बळीराजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

 
Top