धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि युवकांना योग्य दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. असे प्रतिपादन प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर डॉ. बाबासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. महेंद्र चंदनशिवे बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर हे होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मंजुळकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवकांनी योजनेमध्ये कौशल्य विकास करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ स्वयंसेवक असून चालणार नाही तर राष्ट्रीय सेवा योजना ही जगण्यात आली पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.अवधूत नवले यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.बालाजी गुंड यांनी केले तर आभार डॉ.मारुती लोंढे यांनी मानले.
यावेळी सर्व महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होत्या.
