भूम (प्रतिनिधी)-  रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनुलोमच्या वतीने साकत येथे पारधी समाज बांधवांसोबत ‌‘रक्षासूत्र बंधनातून हिंदुत्वबंधन' हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पारधी समाजातील महिला व पुरुष बांधवांना रक्षासूत्र बांधून परस्पर बंधुभाव, सामाजिक समरसता, एकोपा आणि सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी अनुलोमचे परंडा भाग जनसेवक अक्षय देशमुख यांनी रक्षासूत्राचे महत्त्व स्पष्ट केले. रक्षासूत्र हे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना परस्परांशी जोडणारे बंधुभावाचे प्रतीक आहे. या माध्यमातून हिंदू समाजातील सामाजिक समरसता आणि एकात्मता अधिक दृढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

अनुलोमचे उपविभाग जनसेवक अक्षय माढेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे आणि परस्परांमध्ये आपुलकी व विश्वास निर्माण करणे, हीच रक्षासूत्रामागील खरी भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. ‌‘रक्षासूत्र बांधताना एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याचा संकल्प करूया,' असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमाला पारधी समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


 
Top